
देशभरात तब्बल एक कोटी स्मार्ट एलईडी दिव्यांचा लख्ख प्रकाश पडला आहे. गेल्या तीन वर्षांत केंद्र सरकारच्या पथदिवे राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत देशभरातील तब्बल 2 लाख 70 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर एक कोटी स्मार्ट एलएडी दिवे बसविण्यात आले आहेत.
विजेची बचत करण्यासाठी कमी विजेवर चालणारे एलईडी बल्ब घराघरात, सार्वजनिक कार्यालयात आणि पदपथावर लावण्याची मोहीम केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (ईईएसएल) माध्यमातून देशभरात सुरू केली होती. त्याचाच भाग म्हणून पथदिवे राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एक कोटी पथदिवे बसविण्यात आल्याचे केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी सांगितले. या दिव्यांमुळे वर्षाला 671 कोटी युनिट विजेची बचत होणार आहे. तसेच सदर वीजनिर्मिती करत असताना 46 लाख टन एवढा कार्बन डायऑक्साईड वायूचे होणारे उत्सर्जनही थांबले आहे.




























































