
गेल्या आठवड्यात मस्जिद बंदर येथील गोदामावर छापा मारून नामांकित कंपनीच्या नावाने बनविलेली 21 लाखांची बनावट घड्याळे जप्त केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-3 ने आणखी मोठी कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला अटक करून पायधुणी येथील गोदामातून तब्बल एक कोटी किमतीची 5 हजार 281 बनावट घड्याळे जप्त केली.
मस्जिद बंदर येथील कारखान्यात नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट घड्याळे बनवून ती नागरिकांना चढ्या किमतीत विकली जात होती. याबाबत माहिती मिळताच युनिट-3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पथकाने मस्जिद बंदर येथील कारखान्यावर छापा टाकून 21 लाखांची नामांकित कंपनीच्या नावे बनवलेली साडेचार हजार घड्याळे जप्त केली होती. त्यावेळी अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत विकास जैन (38) याचे नाव समोर आले. विकास जैन हादेखील नामांकित कंपनीच्या नावाने बनावट घड्याळे बनवून ती विकतो. तसेच त्याचे पायधुणी येथे त्याचे गोदाम असल्याचे विकासने चौकशीत सांगितले. त्यानुसार युनिट-3 च्या पथकाने पायधुणी येथील विकास जैनच्या गोदामावर छापा टाकला तेव्हा तेथे 1 कोटी 5 लाख 62 हजार किमतीची तब्बल 5 हजार 281 बनावट घड्याळे सापडली. पोलिसांनी तो सर्व मुद्देमाल जप्त करून विकास जैनला अटक केली.
सोशल मीडियावरून घड्याळांची विक्री
अटक आरोपी हे नामांकित कंपनीच्या नावाने बनवलेली बनावट घड्याळे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना विकायचे. इन्स्टाग्राम, व्हॉटस्ऍप, फेसबुकवर घड्याळांची जाहिरातबाजी करून बनावट घड्याळे चढ्या भावाने विकण्याचा गोरखधंदा करायचे असे तपासात समोर आले आहे.




























































