
मलंगगड रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर ‘धूम स्टाईल’ वेगाचा बळी गेल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण धडकेत आदित्य म्हात्रे (22) याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार अमिताभराम (36) हा गंभीर जखमी झाला असून तो अत्यवस्थ आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
रिजन्सी अनंता गृहसंकुल परिसर येथून मलंगगड रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. रस्ता रात्रीच्या वेळी मोकळा असल्याने त्यावरून धूम स्टाईलने गाड्या पळवल्या जातात. आदित्य म्हात्रे हा याच गृहसंकुल परिसरातील रुस्तमजी इमारतीसमोर मित्राला भेटण्यासाठी आला होता. आदित्यने त्याची बुलेट युटर्न मारण्यासाठी वळवली असता मागून भरधाव आलेल्या अमिताभरामच्या दुचाकीची त्याच्या बुलेटला जोरदार धडक बसली. या अपघातात दोघांनीही हेल्मेट न घातल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर स्थानिकांनी दोघांना रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी आदित्यला तपासून मृत घोषित केले.
बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा मानपाडा
पोलिसांनी याप्रकरणी आदित्यचा मित्र आकाश रवी याच्या तक्रारीवरून अमिताभ राम याच्याविरोधात बेदरकारपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या अमिताभची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार करत आहेत.

























































