
देशभरात तब्बल एक तृतियांश म्हणजेच प्रत्येक तिसरा विद्यार्थी खासगी शिकवणी घेत असल्याचे समोर आले आहे. शहरी भागात तर हा एक ट्रेंडच बनला आहे. यावरून सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून योग्यप्रकारे शिकवले जात नसल्याचेच समोर आले असून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे आणि मोदी सरकारचे राष्ट्रीय शिक्षण धोरण फेल ठरल्याचेच उघड झाले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. देशभरातील सरकारी शाळा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. सरकारी शाळांमध्ये एकूण 55.9 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. ग्रामीण भागात 66.0 टक्के विद्यार्थी असून शहरी भागात 30.1 टक्के विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिकत आहेत. तर खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 31.9 टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
असा वाढतोय ट्रेंड
केंद्र सरकारच्या सर्वेक्षणांतर्गत शहरी भागात 30 टक्के तर ग्रामीण भागात 25.5 टक्के विद्यार्थी खासगी शिकवणी घेत आहेत. 52,085 घरे आणि 57,742 विद्यार्थ्यांच्या मुलाखतींद्वार सरकारने खासगी शिकवणी घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा मिळवला. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात खासगी शिकवणीवर भरमसाट खर्च करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.