
सामना प्रतिनिधी । भूम
भूम तालुक्यातील वाकवड येथे झालेल्या मारहाणीत मनोज दत्तू मासाळ या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवार, २२ नोव्हेंबर रोजी रात्री वाकवड शिवारातील येळे खिंड येथे आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत लहू बिरमल मासाळ (२७), आप्पा विठ्ठल मासाळ (४५), बिरमल महादेव मासाळ (६०), राहुल दत्तू मासाळ (२८) हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी भूम पोलिसांत ११ आरोपींच्या विरोधात अप्पाराव विठ्ठल मासाळ फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणातील परमेश्वर येळे यास पोलिसांनी अटक केली आहे तर उर्वरित आरोपी फरार आहेत. ही घटना केळेवाडी शिवारातील शेतात एकमेकांची जनावरे चारण्याच्या कारणावरून झाली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी येळे आणि मासाळ यांच्यात या कारणावरून जोरदार भांडणे झाली होती. ती आपसात मिटवून घेतली होती. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वाकवड शिवारातील येळे खिंड येथे वाकवड येथील मासाळ कुटुंबीय हे वस्तीवर राहते. काल गुरुवार, २२ नोव्हेंबर रोजी आठ ते साठेआठ वाजण्याच्या सुमारास मयताचा चुलता बीरमल मासाळ हा लहुला येळ्याची माणसे मारत आहेत असे ओरडत वस्तीकडे आला. चुलत्याचा आवाज ऐकून फिर्यादी, फिर्यादीचा चुलत भाऊ मनोज व राहुल असे तिघे वेगवेगळ्या मोटारसायकलवर बसून खिंडी जवळ गेले, त्यावेळी तेथे आरोपी लहू मासाळ यास विक्रम येळे, तुकाराम येळे, सचिन येळे, महादेव येळे, हनुमंत येळे, राजेंद्र येळे, अंकुश येळे, परमेश्वर येळे, पुष्पा येळे, मुक्ता येळे, मालन येळे हे गर्दी करून मारत होते. यावेळी मयत मनोज दत्तू मासाळ, त्याचा भाऊ व चुलत भाऊ हे सोडविण्यासाठी गेले असता ते आरोपी या तिघांच्या अंगावर मारण्यासाठी धावले. अंकुश येळे यांच्या हातात खोऱ्याचा दांडा, विक्रम येळे याच्या हातामध्ये कुऱ्हाड, माहदु येळे व सचिन येळे यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी काठीने व दगडाने मासाळ कुटुंबियांना मारले. याच वेळी विक्रम येळे याने फिर्यादीचा चुलत भाऊ मनोज दत्तू मासाळ याच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीचा घाव घातला. यात मनोज हा जागीच कोसळला. त्यांनतर आरोपी तेथून पळून गेले. जखमींना भूम येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. यातील मयताचे मे महिन्यात लग्न झाले होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नातेवाईकांनी आरोपीला अटक केल्याशिवाय मनोज याचे प्रेत ताब्यात घेणार नाहीत अशी भूमिका घेतली होती. यावेळी धनगर समाज बांधव व मनोज याचे नातेवाईक मोठ्या संख्यने या मागणीवर ठाम होते. यावेळी वाकवड येथील पोलीस कर्मचारी यांनी मासाळ कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांची समजूत घातली व दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास प्रेत अंत्यविधीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी परमेश्वर येळे यास अटक केली असून इतर आरोपी अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसासमोर आहे. आरोपींच्या अटकेसाठी पथके तैणात केली आहेत.





























































