कोरोनाच्या भीतीने गावकरी गॅसवर; एक लाख चाकरमान्यांच्या एण्ट्रीने रायगडकरांना टेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. मात्र त्यानंतरही ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत तांडेच्या तांडे मुंबई सोडू लागले. गेल्या 15 दिवसांत एकट्या रायगड जिल्ह्यात तब्बल एक लाखाहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. मात्र, एरवी मुंबईकरांच्या आगत स्वागतासाठी धावणाऱ्या गावकऱ्यांना आता चांगलीच धडकी भरली आहे. कोणाला कोरोना तर नसेल ना, या भीतीने गावागावात टेन्शन वाढले आहे. जिल्हा परिषदेने आलेल्या चाकरमान्यांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वांवर प्रशासनाची करडी नजर असून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन केले जात आहे.

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चाकरमानी आपापल्या गावी चालत, वाहनाने येऊ लागले आहेत. संचारबंदी असताना मुंबई, ठाणे तसेच अन्य राज्यात नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले जवळपास 1 लाख 3026 नागरिक रायगडात दाखल झाले आहेत. अलिबाग, महाड, माणगाव, म्हसळा या तालुक्यांत प्रत्येकी 10 हजारांच्यावर नागरिक दाखल झाले आहेत. त्यामुळे रायगडकरांच्या डोक्याचा ताप वाढू लागला आहे. पनवेलपाठोपाठ श्रीवर्धन, पोलादपूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. बाधा झालेले हे रुग्ण मुंबईतून गावी आले आहेत. त्यामुळे आपल्या गावात आलेल्यांना कोरोना तर झाला नसेल ना, या भीतीने ग्रामस्थ गॅसवर आहेत. प्रत्येक गावात हीच चर्चा असल्याने अनेक मुंबईकरांना आपल्याच गावात उपऱ्यासारखे राहावे लागत आहे. अलिबागमध्ये 12,611 कर्जत 698, खालापूर 1472 पेण 1821 पनवेल 172, पोलादपूर 7477, महाड 12,424, माणगाव 18,329, म्हसळा 14,208, मुरुड 4,107, सुधागड 8,037, श्रीवर्धन 6,553, रोहा 5,056, तळा 8,547 तर उरण तालुक्यात 514 चाकरमानी दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहे. यातील अनेकांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तरीही त्याच्यावर प्रशासनाचे लक्ष आहे. ज्यांचा कालावधी पूर्ण झाला नाही त्याच्यावर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा हे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

दिलीप हळदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद