देशातील 63 अब्जाधीश चालवू शकतात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था!

720

देशाच्या अर्थव्यवस्थेवर सध्या मंदीचे सावट आहे. सर्वसामान्य नागरिकांना मंदीचे आणि महागाईचे चटके बसत आहेत. मात्र, देशातील अब्जाधीशांची संख्या आणि त्यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. ‘ऑक्सफॅम’ या संस्थेच्या अहवालानुसार फक्त एक टक्का हिंदुस्थानींकडे देशाच्या अर्थसंकल्पापेक्षाही जास्त पैसा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या एक टक्के हिंदुस्थानी अब्जाधीशांकडील एकूण संपत्ती ही 70 टक्के हिंदुस्थानींच्या संपत्तीच्या चारपटीपेक्षा जास्त जास्त आहे. त्यात देशातील 63 अब्जाधीश देशाची अर्थव्यवस्था चालवू शकतात, असेही नमूद करण्यात आले आहे.

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये ‘ऑक्सफॅम’ या संस्थेने ‘टाइम टू केअर’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात जगभरातील 2153 अब्जाधीशांच्या संपत्तीचा आढावा घेण्यात आला. जगातील 2153 अब्जाधीशांकडे जागतिक लोकसंख्येच्या 60 टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती आहे. विशेष म्हणजे 63 अब्जाधीश हिंदुस्थानींकडे देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत जास्त संपत्ती आहे. 2018-19 या वर्षात हिंदुस्थानचे बजेट 24 लाख 42 हजार 200 कोटी इतके होते. जागतिक अर्थव्यवस्था सध्या अनेक संकटांना तोंड देत आहे. त्यामुळे जगभरात महागाई वाढली आहे. अनेकांच्या रोजगारावर टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीतही सर्वसमान्यांना उपजीविकेसाठी संघर्ष करावा लागत आहे. तर अब्जाधीशांच्या संख्येत आणि त्यांच्या संपत्तीत सात्त्याने वाढ होत आहे. त्याबाबत या अहवालात जगभर झपाट्याने वाढणाऱ्या आर्थिक विषमतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत होत असून गरिबांची अवस्था बिकट बनली आहे. गेल्या दशकात नव्या अब्जाधिशांची संख्या वाढली आहे.

गरीब आणि श्रीमंतांमधील वाढती दरी जगासाठी घातक आहे. गरिबांच्या कल्याणासाठी ठोस धोरणे राबवली जात नाहीत ही विषमतेची दरी कमी होणार नाही, असे ‘ऑक्सफॅम इंडिया’ने म्हटले आहे. ‘ऑक्सफॅम’ च्या अहवालात लिंगभेदाबाबतही मत नोंदवण्यात आले आहे. महिला आणि पुरुषांमधील वेतन फरकाबाबत या अहवालात तुलनात्मक अंदाज व्यक्त करण्यात आला. एका महिला कर्मचाऱ्याला एका टेक्नॉलॉजीमधील कंपनीच्या सीईओ इतके वेतन मिळवण्यासाठी 22 हजार 277 दिवस लागतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या