खडकी, विश्रांतवाडीत एटीएम मशीनची तोडफोड; एकजण अटकेत

चोरी करण्यासाठी खडकी आणि विश्रांतवाडीत एटीएम मशीनची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी गस्तीवरील पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर खडकीतील एलफिस्टन रोड आणि विश्रांतवाडीतील टिंगरेनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी विशाल संपत चंदनशिवे (वय 18, रा. प्रतिकनगर, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी आकाश वाघमारे (वय 30, रा. वाकड ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलीस बुधवारी रात्री गस्त घालत असताना एलफिस्टन रोडवरील एका एटीएममध्ये विशाल तोडफोड करुन चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दुसऱ्या घटनेत अल्पवयीन चोरट्याने विश्रांतवाडीतील टिंगरेनगरमध्ये असलेल्या एटीएम मशीनची तोडफोड केली. बीट मार्शल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सोपान नरळे अधिक तपास करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या