
पोलीस यंत्रणा लॉकडाऊनच्या बंदोबस्तात असल्याने याचा गैरफायदा घेत विनापरवाना देशी-विदेशी दारुची चढ्या भावाने विक्री करणाऱ्याला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. संतोष अशोक कदम (30) असे या संशयिताचे नाव असून तो चिंचघर वेताळवाडी येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील चिंचघर वेताळवाडी येथील एका घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत एक व्यक्ती देशी-विदेशी दारू विनापरवाना चढ्या भावाने विकत असल्याची माहिती खेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत गडदे यांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद तसेच खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरिक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत गडदे यांनी पोलीस नाईक विरेंद्र आंबेडे, पोलीस शिपाई संकेत गुरव, पोलीस शिपाई साजिद नदाफ, पोलीस शिपाई अजय कडू, महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा मोरे यांच्यासह चिंचघर, वेताळवाडी येथे छापा टाकला. संतोष अशोक कदम याला त्याच्याच घराच्या मागील बाजूस
असलेल्या मोकळ्या जागेत देशी-विदेशी बनावटीच्या कंपनीची दारु विनापरवाना विकत असताना 30 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.






























































