एक रुपयांत मिळणार नवीन कपडे, बंगळुरुत सुरू झाली कपड्यांची बँक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरूमध्ये एक अनोखी बँक सुरू झाली आहे. ही कपड्यांची बँक असून या बँकेत अवघ्या एक रुपयांत कपडे मिळणार आहे. परंतु ही सुविधा फक्त गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी सुरू करण्यात आली आहे.

बंगळुरूमध्ये चार मित्रांनी एक अनोखी कपड्यांची बँक सुरू केली आहे. या बँकेत गरीब आणि गरजु व्यक्तींना एक रुपयांत कपडे मिळणार आहे. या बँकेत गरजुंनी आपले जुने कपडे दान करून एक रुपया देऊन नवीन कपडे घेऊन जायचे आहे. या बँकेचे नाव इमॅजिन क्लोथ असे आहे. विनोध प्रेम लोबो, मेलिशा नोरोन्हा, नितीन कुमार आणि विघ्नेश या चार मित्रांनी ही बँक सुरू केली आहे.

विनोध प्रेम लोब यांनी दिलेल्या माहितीनुसार चार मित्रांनीमिळून इमॅजिन फाऊंडेशन नावाने एक स्वयंसेवी संस्था सुरू केली आहे. त्यानुसार गरीब आणि गरजुंना कपडे मिळतील. 12 सप्टेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक शहरात 2 बीएचके फ्लॅटमध्ये ही बँक सुरू करण्यात आली आहे. गरीब आणि गरजुंना कपडे मिळावे या हेतुने सुरू झालेली बँक सध्या फक्त रविवारी सुरू ठेवण्यात आली आहे.

2002 साली या चार मित्रांनी अशाच प्रकारे मंगळूरुमध्ये एक कपड्यांची बँक सुरू केली होती. तेव्हा स्थानिक विद्यार्थ्यांनी कपडे जमा करण्यसाठी मदत केली होती. अनेक वर्ष ही बँक यशस्वीरित्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आता बेंगलुरूमध्ये या मित्रांनी ही बँक सुरू केली आहे. लॉकडऊनमध्ये अनेक मजुरांचे रोजगार गेले होते. यासाठी मित्रांनी ओळखीच्या लोकांकडून कपडे जमा करण्यास सुरूवात केली. अनेक जणांनी चांगला प्रतिसाद देत कपडे दिले आहेत. या बँकेत सध्या शर्ट पँट, स्कर्ट, साडी, जॅकेट तसेच घोंगडीही ठेवण्यात आली आहे. या कपड्यांमध्ये जुने आणि नव्या कपड्यांचा समावेश असून गरजुंचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे लोबो यांनी सांगितले.