एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात विवाहितेवर गोळीबार; घटना CCTV मध्ये कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पट्टी परिसरात एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका विवाहित महिलेच्या डोक्यात भररस्त्यात गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रुबी हिचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. आरोपी करण हा लग्नापूर्वीपासूनच रुबीला त्रास देत होता. रुबीचे लग्न झाल्याने तो संतापला होता. शनिवारी जेव्हा रुबी आपल्या पतीसोबत बाहेर जात होती, तेव्हा करणने त्यांना अडवले. सुरुवातीला त्याने रुबीच्या पतीशी वाद घातला आणि त्यानंतर अचानक रुबीवर गोळ्या झाडल्या. त्याने एक गोळी तिच्या डोक्यात, तर दुसरी शरीराच्या इतर भागावर झाडली.

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये आरोपी स्पष्टपणे गोळीबार करताना आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाताना दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पंजाबमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.