लोकलवर पुन्हा दगडफेक; चार प्रवासी जखमी, एकाला अटक

30

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेच्या लोकलवर दगडफेकीचे प्रकार सुरूच आहेत. आज कुर्ला ते विद्याविहार दरम्यान दगडफेकीत चार प्रवासी जखमी झाले. दगडफेकीप्रकरणी राकेश सिंग धरणसिंग ला कुर्ला रेल्वे पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून गुन्हा दाखल केला.

कुर्ला ते मुलुंड दरम्यान लोकलवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी रेल्वे ट्रक परिसरात साध्या वेशात गस्त सुरू केली आहे. आज दिवसभरात कुर्ला ते विद्याविहार दरम्यान झालेल्या दगडफेकीत चार प्रवासी जखमी झाले. टिटवाळा येथे राहणारा राजेश पवार हा डोळ्याला दगड लागल्याने जखमी झाला. तर अजय कहार आणि रत्नदीप चंदनशिवे हेदेखील दगडफेकीत जखमी झाले. त्याचप्रमाणे कुर्ला आणि टिळक नगर स्थानकात झालेल्या दगडफेकीत तौसिक खान हा प्रवासी जखमी झाला. त्या चौघांवरही सायन रुग्णालयात उपचार करण्यात आले.
राकेश हा मूळचा हरयाणाचा रहिवासी आहे. तो ट्रकमध्ये कचरा गोळा करण्याचे काम करतो. त्याने दगडफेक केल्याचे पोलीस उपायुक्त एम. मकानदार यांनी सांगितले. त्याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तो नेमका कशाकरता दगडफेक करतो हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

– गेल्या आठवडय़ात चार प्रवासी दगडफेकीत जखमी झाल्याची नोंद
– दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी 16 जणांचे पथक तयार केले.
– एप्रिल ते जुलैदरम्यान दगडफेकीच्या आठ घटनांची नोंद.

आपली प्रतिक्रिया द्या