
इटलीच्या एका मोठय़ा सरोवराखाली अख्खं गाव दडलं होतं. 70 वर्षांपूर्वी हे गाव एकाएकी गायब झाले होते. त्याच्याबद्दल कुणालाच काही माहिती नव्हते. आता मात्र सरोवराचे पाणी पूर्ण आटल्याने लोकांना गावाचे अवशेष सापडू लागले आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात शेअर होत आहेत.
इटलीतील दक्षिण टायरोल येथे कृत्रिम सरोवर आहे. रेसिया सरोवर असे त्याचे नाव आहे. चोहोबाजूने बर्फाच्या पाण्याने वेढलेले 14व्या शतकातील चर्चचे घुमट ही रेसिया सरोवराची ओळख आहे. मात्र आता या सरोवराची चर्चा होतेय ती त्याखाली सापडलेल्या एका गावामुळे. क्युरोन असे या गावाचे नाव आहे. 1950 सालापर्यंत गावात शेकडो लोक कुटुंबकबिल्यासह राहत होते. मात्र 70 वर्षांपूर्वी हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट बनवण्यासाठी इटलीच्या सरकारने एक बांध घातला. त्यासाठी दोन्ही सरोवर एकमेकांना जोडण्यात आले. परिणामी क्युरोन गावाचे अस्तित्वच मिटले आणि हे गाव देशाच्या नकाशातून अचानक गायब झाले. मात्र आता सरोवराचे पाणी पूर्ण आटल्याचे गावाच्या अस्तित्वाच्या खुणा जाणवू लागल्या आहेत. रेसिया सरोवरातील क्युरोन गावाची कथा एवढी रोमांचक आहे की त्यावर नेटफ्लिक्सने सिरीज बनवलेली आहे. याशिवाय पुस्तकही प्रकाशित झालेले आहे.



























































