
कोरोनाच्या दुसऱया लाटेत बालकांमध्येही अगदी गंभीर स्वरूपाची लक्षणे जाणवू लागली आहेत. यात प्रामुख्याने श्वास घ्यायला त्रास होणे हा एक गंभीर त्रास अनेक बालकांना होताना दिसत आहे. बोदवड तालुक्यातील जुनोने येथील एक वर्षीय चिमुकल्याने 18 दिवस ऑक्सिजनवर राहून कोरोनासारख्या गंभीर आजारावर मात केली.
जुनोने येथील एक वर्षीय बालकाला ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास यासारखी गंभीर लक्षणे जाणवू लागल्याने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या चिमुकल्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. सलग 18 दिवस ऑक्सिजन व त्यानंतर औषधोपचार करून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास 23 दिवसांनी बालरोग विभागाला यश आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करताना या बालकाची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली होती. प्रयोगशाळेतील तपासण्या, एक्स-रे याच्या आधारावर त्या बालकावर योग्य उपचार करण्यात डॉ. सुरोशे यांच्या नेतृत्वातील वैद्यकीय पथकाला यश आले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांच्या उपस्थितीत बालकाला नुकतीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
दोन महिन्यांत 38 बालकांवर उपचार
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागात मार्च ते मे या दोन महिन्यांत तब्बल 38 कोरोना पॉझिटिव्ह बालकांवर उपचार करण्यात आले. बालकांना कोरोनाची कुठलीही लक्षणे जाणवली तर उशीर न करता तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.






























































