कांदा महागला?? No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक

1413

>> शमिका कुलकर्णी

महागलेल्या कांद्याने सध्या गृहिणी त्रस्त झाली आहे. रोजच्या स्वयंपाकात सढळहस्ते वापरल्या जाणाऱया कांद्याच्या वापराला जरा चाप बसला आहे. पण मग कांद्याला पर्याय काय…? कांदा न वापरताही कसा करायचा रोजचा टेसदार स्वयंपाक…

कांदा दिवसेंदिवस महागतच चाललाय… 100/-, 120/-, 150/- रुपयांपर्यंत दर गेले आहेत. आपल्या मराठमोळ्या जेवणात कांद्याशिवाय पान हलत नाही. अगदी साध्या पिठल्यातसुद्धा कांदा हवाच. आपल्या मराठी माणसाचा आहार म्हणजे कांदा-भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. अजून काय लागतं आपल्याला… पण गेल्या कित्येक दिवसांपासून 20-25 रुपयाला मिळणाऱया कांद्याचे भाव कलाकलाने वाढायला लागले… आता कांद्याने सहज शंभरी पार केली आहे. त्यामागचे अर्थकारण, राजकारण काहीही असो… पण अगदी सहज… साधी गोष्ट म्हणजे या चढय़ा दरामुळे स्वयंपाकघरात सहजच किलोभर आढळणारा कांदा मात्र हळूहळू कमी कमी होत चाललाय… यातून त्रस्त झालीये आपली गृहिणी… महिन्याचे गणित जमवायचे कसे… पण काळजी करू नका. प्रत्येक समस्येवर उत्तर हे असतेच… मग कांद्यालाही पर्याय आहेच की… कांद्याचा वापर न करतताही अनेक टेसदार पदार्थ आपल्याला करता येतात…

बिनकांद्याची न्याहारी-
कांदा पोह्यांच्याऐवजी बटाटे पोहे करावेत. त्यात चवीसाठी हिरवा मटार व शेंगदाणे घालावेत.
इडली, डोसा किंवा उपमा हे पदार्थ कांदा न घालता केले जातात. सोबत चटणी, उपम्यात कांदा न घालता काजू, मटार व टोमॅटो घालावा.
घावन व चटणी हा सोपा व चविष्ट पदार्थ आहे
मुगाचे डोसे, बेसन किंवा मूगडाळीचे चिले, टोमॅटो ऑमलेट हे पदार्थ लसूण व तिखट घालून उत्तम लागतात. मिरची, कोथिंबीर व टोमॅटो घालून त्याचा स्वाद अधिक वाढतो.

अंडय़ाचे ऑमलेट – गार्डन ऑमलेट हे कांदा न घालता उत्तम लागते. त्यात टोमॅटो, मशरूम, कॉर्न किंवा आवडीनुसार भाज्या घालून स्वादिष्ट ऑमलेट तयार.

उरलेली पोळी किंवा भाकरीचा कुस्करा करताना कांदा न घालता लसूण फोडणी टोमॅटो व दाण्याचे कूट घातले तर चव चांगली लागते.

दुपारच्या व रात्रीच्या जेवणात कांद्याचा आवर्जून वापर केला जातो म्हणूनच विविध परतलेल्या भाज्या, रस्से, वाटणाचे पदार्थ व मांसाहारी पदार्थ कांदा न घालता कसे करावेत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

परतलेल्या भाज्यांमध्ये कांदा न घालता लसूण व टोमॅटोच्या फोडणीवर परतावे. त्याचबरोबर चवीसाठी कांदा-लसूण मसाला किंवा दाण्याचे कूट घालावे.

कडधान्य – कडधान्य करताना कांद्याचा वापर केला जातो. मग वाटणासाठी किंवा कांदा-टोमॅटो ग्रेव्ही असो कांदा घातला जातो. पण राजमा किंवा छोले टोमॅटोच्या ग्रेव्हीत करता येतात. आलं लसूण पेस्ट सुक्या किंवा ओल्या मिरच्या वाटून व छोले किंवा राजमा मसाला घालून चविष्ट छोले किंवा राजमा बनतो.
मूग व मटकीची उसळ टोमॅटो लसूण व उसळ मसाला घालून करावी.

भाताचे प्रकार – विविध भाताचे प्रकार कांदा न घालता करता आले तर रात्रीच्या जेवणाचा प्रश्न सोडवणे सोपे जाते. मसाले भात, वांगी भात, तोंडली भात, कोबी किंवा फ्लॉवरचा भात हे भात गोडा मसाला घालून केले जातात.

कांद्याशिवाय विविध वाटण व ग्रेव्ही –
ओले खोबरे व लसूण वाटण – हे वाटण ओले खोबरे, लसूण व चवीला कांदा, लसूण मसाला घालून करावे. सर्व साहित्य एकत्र वाटून मग शिजलेल्या भाज्या किंवा चिकनमध्ये घालावे.

टोमॅटो ग्रेव्ही – कांदा टोमॅटोची ग्रेव्ही अनेक भाज्या व मांसाहारी पदार्थात वापरली जाते. कांदा न घालताही उत्तम प्रकारे ग्रेव्ही बनवता येते. टोमॅटो प्युरी, आलं लसूण पेस्ट, सुक्या मिरची पेस्ट शिजवून घ्यावी. त्यात तेल सुटायला लागले की वाटलेले मगज, गरम मसाला घालावा. ही ग्रेव्ही बऱयाच पदार्थांत उपयोगी येते. पनीरच्या भाज्या, दम आलू, मटर आलू, बटर चिकन अशा अनेक पदार्थांत वापरली जाते. अंडय़ाची करी या ग्रेव्हीत करू शकतो.

बेसनची पेस्ट घातल्याने कोणत्याही रसभाजीला दाटपणा येतो. दही व बेसन घातल्याने करीसारख्या चवीचे पदार्थ बनतात.
नारळाच्या दुधातील ग्रेव्ही – खोबरे, धने, सुक्या मिरच्या व चिंच वाटून व हवे असल्यास नारळाचे दूध घालून स्वादिष्ट रस्सा बनतो. त्यात मासे किंवा प्रॉन्स घालून उत्तम चव येते.

साठवलेल्या तळलेल्या कांद्याचे वाटण – कांदा स्वस्त असताना जर तळून ठेवला व साठवला तर महागाईच्या काळात कांदा-खोबऱयाचे वाटण या तळलेल्या कांद्यापासून करता येते. हे वाटण नेहमीप्रमाणे कालवण, रस्सा किंवा कडधान्य करताना वापरू शकतो. तळलेला कांदा विकतही मिळतो व त्याचे वाटण करणे सोपे जाते.

कांद्याचा योग्यवेळी साठा करून ठेवणे योग्य असते. म्हणूनच कांदा खरपूस तळून तो बरेच दिवस साठवू शकतो. त्याचबरोबर कांदा व खोबरे खरपूस भाजून त्याचे वाटण बारीक वाटून घ्यावे. हे कांद्या खोबऱयाचे वाटण बरेच दिवस फ्रिझरमध्ये टिकते. अशा प्रकारे कांदे साठवून स्वयंपाकात वापरणे सोपे जाते. कांदा पावडरही बाजारात उपलब्ध असते. त्याचाही वापर स्वयंपाकात होतो.

बटर चिकन
साहित्य – 400 ग्रा. बोनलेस चिकन, दही, तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ, लिंबू रस, गरम मसाला, 1 चमचा तेल. ग्रेव्ही – तेल आणि बटर, खडा मसाला, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, कसूरी मेथी, 4 टोमॅटो प्युरी

कृती – चिकन मॅरिनेट करण्यासाठी चिकनमध्ये मीठ, तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, लिंबू रस मिक्स करा आणि 15 मि. फ्रीजमध्ये ठेवा मग दही घाला आणि गरम मसाला कसूरी मेथी आणि तेल घालून पुन्हा 1 तास ठेवा. मग हे चिकनचे तुकडे तव्यावर किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्या.
ग्रेव्ही – कढईत तेल आणि बटर घाला. मग खडा मसाला घालून आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो प्युरी घाला. तेल मुरायला लागल्यावर लाल मिरची पावडर, कसूरी मेथी, मध घालावा मग सारखे करून त्यात चिकनचे तुकडे घालावे आणि झाकण ठेवून शिजवावे. मग वरून हिरवी मिरची व फेटलेली साय घालावी आणि ढवळावे.

थालीपीठ
साहित्य – भाजणी, गाजर, कोबी किंवा दुधी किसून घ्यावे, मीठ, हळद, तिखट, धनेजिरे पावडर.
कृती – भाजणीत किसलेली भाजी, मीठ, हळद, तिखट, धनेजिरे पावडर घालून गोळा करा. याचे गोल थालीपीठ तव्यावर थापून तेल सोडून थालीपीठ करावे. खुसखुशीत थालीपीठ दह्याबरोबर व दाण्याच्या चटणीबरोबर चविष्ट लागतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या