कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी लासलगावला शेतकऱ्यांचे ‘शोले’स्टाईल आंदोलन

लाल कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण सुरू असताना केंद्र सरकार निर्यातबंदी उठवण्याकडे दुर्लक्ष करीत आहे, यामुळे शुक्रवारी दुपारी संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव येथे बाजार समितीजवळील जलकुंभावर चढून ‘शोले’स्टाईल आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. तब्बल दोन तास हे आंदोलन सुरू होते.

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, जय किसान फोरम व प्रहार संघटना यांच्या वतीने आज आंदोलनाचा पवित्रा उचलण्यात आला. लासलगाव बाजार समितीत आज आवक 15 हजार क्विंटल होती, तर भाव किमान 900, कमाल 1941 व सरासरी 1750 रुपये क्विंटल मिळाला. दिवसेंदिवस दरात घसरण सुरू असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. भाव स्थिर राहावे यासाठी निर्यात खुली करावी, अशी मागणी करीत शेतकरी दुपारी दोनच्या सुमारास जलकुंभावर चढले. जोपर्यंत उच्चपदस्थ अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा त्यांनी इशारा दिला. निफाडचे नायब तहसीलदार योगेश शिंदे, तलाठी नितीन केदार यांनी घटनास्थळी येवून निवेदन स्वीकारले. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत निवेदन पोहचवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तब्बल दोन तास सुरू असलेले हे आंदोलन शेतकऱ्य़ांनी मागे घेतले. या आंदोलनात राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, निफाड तालुका अध्यक्ष संजय साठे, जय किसान फोरम संघटनेचे निवृत्ती न्याहारकर, प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर, प्रकाश चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या