
राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात परराज्यातही कांद्याची आवक कमी आहे. त्यामुळे आवक कमी आणि मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात आलेली तेजी कायम आहे. पारनेरच्या बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी 6 हजार 500 रुपये भाव मिळाला. त्याखालोखाल संगमनेर, अकोले, राहुरी आणि श्रीरामपुरात दर मिळाला. कांद्याचे संकट आणखी काही दिवस राहणार असल्याने हा कांदा ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे.
रविवारी पारनेरच्या बाजार समितीत 1 नंबर कांद्याला 5 हजार 500 ते 6 हजार 500 रुपये भाव मिळाला. या ठिकाणी 4 हजार 676 कांदा गोण्यांची आवक झाली. पारनेरमध्ये 2 नंबरच्या कांद्याला 4 हजार 500 ते 5 हजार 400 रुपये भाव मिळाला असून 3 नंबर कांद्याला 1 हजार ते 3 हजार 500 रुपये भाव मिळाला आहे. अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 261 गोणी कांद्याची आवक झाली. बळीराम नामदेव सावंत यांच्या 10 गोण्याच्या वक्कलला 6101रूपये भाव मिळाला. शिवाजी गोर्डे यांच्या 9 गोण्यांना 6000 रुपये, सुभाष भोर यांच्या 3 गोण्यांना 6001 रुपये, संदीप मंडीलक यांच्या 15 गोण्यांना 5800 रुपये याप्रमाणे भाव मिळाला.


























































