कांद्याचे बियाणे खरेदीसाठी राज्यातील शेतक-यांची झुंबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

कांद्याचे बियाणे खरेदीसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातुन शेतक-यांची झुंबड उडाल्याने कृषी विद्यापीठ प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. बियाणे खरेदीसाठी उडालेला शेतक-यांचा गोंधळ थांबविण्यासाठी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे यांची भूमिका महत्वपुर्ण ठरली.

राहुरी कृषी विद्यापिठात तयार झालेल्या दर्जेदार कांदा बियाणास संपुर्ण राज्यातुन मागणी आहे. आज सोमवारी कृषी विद्यापिठाच्या बी बीयाणे केंद्रावर कांद्याचे ‘फुले समर्थ’ तसेच ‘फुले बसवंत’ हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने बियाणे खरेदीसाठी नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील कानडगाव भारडी, चौंडी, गोयेगाव, चांदवड येथील हजारो शेतकरी उपस्थित होते.

हजारो शेतकरी एकाच वेळी बियाणे केंद्रावर जमल्याने चांगलाच गोंधळ उडाला. काही शेतकरी रांग सोडून मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना आरडाओरड होऊन वातावरण तणावपूर्ण बनले होते. हा गोंधळ थांबविण्यासाठी कृषी विद्यापिठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसमवेत शेतक-यांचा गोंधळ थांबविण्याचे मोठे प्रयत्न केले. मात्र बियाणे खरेदीसाठी शेतक-यांची उच्चांकी गर्दी असल्याने सुरक्षा विभागावर मर्यादा आल्या.

या घटनेची माहीती मिळताच कृषी विद्यापिठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतक-यांना शांततेत बियाणे खरेदीचे आवाहन केल्याने बि बियाणे केंद्रावर तब्बल २ तास सुरू असलेला गोंधळ थांबण्यास मदत झाली. यावेळी डॉ. कोकाटे यांनी सर्व शेतक-यांना बियाणे उपलब्ध होतील अशा सुचना बियाणे केंद्रातील अधिका-यांना केल्या. दुपारनंतर बियाणे खरेदी सुरळीत झाली. शांततेत बियाणे वाटप होण्यासाठी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व सुरक्षा रक्षक बियाणे केंद्रावर ठाण मांडुन होते.

राहुरी कृषी विद्यापिठात एकुण १० टन ६०० किलो कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असुन या मध्ये ‘फुले समर्थ’ ७ टन ५०० किलो तर ‘फुले बसवंत’ ३ टन १०० किलो कांदा बियाणांचा समावेश आहे.

राहुरी कृषीपिठाचे कांदा बियाणे रोगाला बळी पडत नाहीत. बदलत्या वातावरणात हे कांदा बियाणे दर्जेदार असुन पावसाळ्यात एकरी १०० क्विंटल उत्पादन मिळत आहे. या कांद्याला मार्केटला चांगला भाव आहे. कांदा बियाणे, लागवड, खते, काढणी, औषध फवारणी, वाहतुक, काढणी हा एकरी ४० हजार रूपये खर्च होत असलेल्या पावसाळी कांद्याला १२ ते १५ रूपयापर्यंत किलोचा भाव मिळाल्यास साडेतीन महिन्यात येणा-या कांदा पिकातुन दीड लाख रूपयांचे उत्पादन मिळत आहे.

भगवान तुळशीराम भालनोर,शेतकरी मु.कुंदलगाव, ता.चांदवड,जिल्हा नाशिक.