
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज देशातील उच्चांकी कांद्याची आवक झाली असून, दिवसभरात 17 कोटी 11 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. सुमारे 1267 ट्रक कांद्याचे ट्रक आल्याने संपूर्ण बाजार समितीत चोहोबाजूने ट्रकची प्रचंड दाटीवाटी झाली होती.
सोलापूर बाजार समितीत जानेवारीपासून प्रचंड प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. गेल्या 20 दिवसांत महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठय़ा प्रमाणावर कांदा येत आहे. दोन दिवसांपूर्वी सुमारे 1083 ट्रक कांद्याची आवक झाली होती. शनिवारी सोलापुरात 1267 ट्रक कांद्याची आवक झाली. दुपारी तीनपर्यंत कांद्याचा लिलाव करण्यात आला. बीड, धाराशिव, लातूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, कलबुर्गी, विजयपूर, बीदर आदी महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतून रात्रीपासून कांद्याचे ट्रक येत होते. त्यामुळे बाजार समितीत किराणा भुसार व भाजीपाला विभागात कांदा उतरविण्यात आला होता. सुमारे 1 लाख 26 हजार 760 क्विंटलची आवक झाली होती.
शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये समाधान
आजच्या दिवसभरात कांद्याची 17 कोटी 11 लाख रुपयांची उलाढाल झाली. कांद्याची आवक वाढली असली तरी 2600 रुपयांपर्यंत दर मिळाला असून, सरासरी 1350 पर्यंत सर्वसाधारण दर होता. सदरचा कांदा दक्षिण हिंदुस्थानात पाठविण्यात येत असून, तमिळनाडू, आंध प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक राज्यांत मोठय़ा प्रमाणावर पाठविण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत कांदा उतरविण्याचे व पाठविण्याचे नियोजन करण्यात येत होते. गेल्या 20 दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या या कांद्याची आवक ही देशातील उच्चांकी असल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. यंदाच्या वर्षी जानेवारीपासूनच कांद्याने बाजार समिती व्यापल्याचे चित्र आहे. कांद्याला योग्य दर मिळत असल्याने शेतकरी व व्यापारीही समाधानी असल्याचे दिसून आले.

























































