
अहिल्यानगर तालुका पूर्वी ज्वारीचे आगार म्हणून ओळखला जायचा. मात्र, गेल्या दोन दशकांपासून तालुक्यात गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार विक्रमी कांदा उत्पादन होत आहे. आता हे कांद्याचे आगार संकटात अडकले असून, वातावरणातील बदल, अतिवृष्टी तसेच अवकाळीचे सावट, वाढलेला उत्पादन खर्च अन् गडगडलेले भाव यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरविल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांची मदार कांदा पिकावरच अवलंबून असते. शेतकऱ्याचे वार्षिक गणितही कांदा पिकावरच आखले जाते. गेल्या काही वर्षांपासून कांदा पिकावरच शेतकरी आपली सोनेरी स्वप्ने रंगवत असे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कांद्याने अक्षरशः शेतकऱ्यांना रडवले आहे. तालुक्यात पिकणाऱ्या गावरान, लाल कांद्याला महाराष्ट्रासह बंगळुरू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल तसेच इतर ठिकाणी मोठी बाजारपेठ मिळते.
सद्यःस्थितीत कांद्याचे भाव गडगडलेले आहेत. सध्याच्या भावात कांदा विकणे शेतकऱ्याला परवडणारे नाही. अनेक शेतकऱ्यांनी गावरान कांदा वखारीमध्ये साठवून ठेवला होता. आता तो खराब होण्यास सुरुवात झाली आहे. अद्याप बाजारभाव वाढलेले नाहीत. त्यातच आता लाल कांदाही बाजारामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्याची आशा ‘धूसर’ झाली आहे. यामुळे आता तालुक्यातील शेतकऱयांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. कांदा पिकाऐवजी गहू, ज्वारी, हरभरा व इतर चारा पिकांकडे शेतकऱयांनी आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे तालुक्यात कांदा उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
एक एकर कांद्याची लागवड केली होती. बियाणे, मशागत, लागवड व औषधांच्या फवारणीसाठी 70 हजार रुपये खर्च झाला. आता बाजार भाव गडगडलेले असल्यामुळे पीक तोटय़ात जाणार होते. वैतागून उभ्या कांदा पिकात नांगर घालून चारा पिकाची पेरणी केली आहे.
– हेमंत शेटे, शेतकरी, जेऊर
उभ्या पिकात नांगर!
कांद्याचे गडगडलेले भाव पाहून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात नांगर घातल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले. बियाणे, रोप, कांदा लागवड, शेतीची मशागत, महागडय़ा औषधांची फवारणी, खते, खुरपणी, काढणी यासाठी मोठा खर्च येतो. मात्र, उत्पन्नाची शाश्वती नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याच्या उभ्या पिकात नांगर घातला आहे.
परराज्यात विक्रमी उत्पादन!
मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांनी कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यामुळे मागणी घटली. महाराष्ट्रात अहिल्यानगरसह इतर जिह्यांनी मोठय़ा प्रमाणात कांदा लागवड केली आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी गावरान कांदा वखारीमध्ये साठवून ठेवला आहे. त्यामुळे भाव वाढले जात नाहीत. या कारणातूनच बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी कांदा लागवडीकडे पाठ फिरवून इतर पिकांची निवड केली आहे.





























































