एलपीजीच्या तुटवड्यामुळे कांदा ‘गॅस’वर; मागणी घटली, किलोचा भाव ८ ते १२ रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रातील शेकडो हॉटेल बंद झाल्याने कांदा ‘गॅस ‘वर आला आहे. महाराष्ट्रात आता उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाल्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये दररोज १०० गाड्या कांदा येतो. मात्र उठाव कमी असल्यामुळे जवळपास ६० गाड्या रोज विकल्या जात असून ४० गाड्या शिल्लक राहात आहेत. मागणी घटल्याने कांद्याचा दर ८ ते १२ रुपये किलोपर्यंत आला आहे.

आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. हा गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. त्याचा सर्वाधिक फटका एपीएमसीमधील कांदा-बटाटा मार्केटला बसला आहे. राज्याच्या विविध भागांतून एपीएमसी मार्केटमध्ये दररोज १०० पेक्षा जास्त गाड्यांची आवक होते. मात्र हॉटेल बंद झाल्यामुळे कांद्याचा खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे दररोज कांद्याच्या ४० गाड्या शिल्लक राहात आहेत. ठोक मार्केटमध्ये ग्राहक नसल्यामुळे कांद्याचे दर फार कमी झाले आहेत. एक नंबरचा कांदा ८ ते १० रुपये किलो या दराने विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे.

निर्यातीवर मोठा परिणाम आखातात युद्ध सुरू असल्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरही मोठा परिणाम झाला आहे. जेएनपीटी बंदरात कांदाचे अनेक कंटेनर अडकून पडले होते. निर्यात घटल्यामुळेही कांद्याचे दर कमी झाले आहेत. एप्रिलपासून उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येणार आहे. परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, अशी प्रतिक्रिया कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केली आहे.

५० किलोच्या गोणीचा वाद
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या गोणीचे वजन ५० ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र ही सक्ती राज्यातील अन्य कोणत्याही बाजार समितीमध्ये नाही. या मार्केटमध्ये येणारा माल हा थेट शेतकऱ्यांकडून आणि अन्य बाजार समितींमधून येतो. त्यामुळे बहुतेक गोणी या ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या असतात. जास्त वजनाच्या गोणी माथाडी कामगार गाडीतून खाली उतरवत नसल्याने वाद निर्माण होत आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि अन्य शहरात महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाईचा मोठा धडका सुरू केला आहे. अतिक्रमण विभाग फेरीवाल्यांवर तुटून पडला आहे. माल मोठ्या प्रमाणात जप्त केला जात आहे.
या कारवाईमुळेही फेरीवाल्यांनी ठोक मार्केटमधील खरेदी बंद केली आहे. हे किरकोळ विक्रेते मार्केटकडे फिरकत नसल्यानेही मार्केटमध्ये माल मोठ्या प्रमाणात पडून राहात आहे.

ठोक बाजारात कांदा ८ ते १२ रुपये किलो या कवडीमोल दराने विकला जात असला तरी किरकोळ बाजारात कांदा तेजीत आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरात अनेक ठिकाणी कांदा ३० रुपये किलो या दराने ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे.