अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : पुन्हा नवीन वेळापत्रक जाहीर

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आता तिसऱ्यांदा कोलमडल्याने नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता तिसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, नागपूर खंडपीठाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी ही फेरी पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार मंगळवारी तिसरी फेरी घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशासाठी ११ मेपासूनच अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली होती. यंदा ११२ कनिष्ठ महाविद्यालये या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. त्यांची प्रवेश क्षमता २८ हजार ७३५ एवढी आहे. त्यासाठी १९ हजार १५९ विद्यार्थ्यांनी अर्जांचे दोन्ही भाग भरले आहेत. पहिल्या फेरीत ५ हजार ९२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीत ३ हजार ५२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर कोटा अ‍ॅडमिशनसह एकूण १० हजार ७५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तिसरी फेरी गुरुवारी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल लागला. त्यानुसार अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील इनहाऊस कोट्यामधील प्रत्यार्पित जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून भराव्यात. त्यानंतर तिसऱ्या फेरीची यादी जाहीर करण्यात येईल, असेही निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.

असे आहे नवीन वेळापत्रक
प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून तिसऱ्यांदा वेळापत्रक खोळंबले असून, आता पुन्हा नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी ११ वा., ३१ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान तिसऱ्या यादीत अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश, ३ ऑगस्ट रोजी रिक्त जागा व तिसऱ्या यादीतील कट ऑफ, ३ ते ४ ऑगस्ट ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत, ७ ऑगस्ट चौथी गुणवत्ता यादी, ७ ते ९ ऑगस्ट चौथ्या यादीत अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश, १० ते ११ ऑगस्ट कॉलेज स्तरावरील बायफोकल अभ्यासक्रमाचे प्रवेश अपलोड करणे.