
वर्ष 2022 मध्ये घेण्यात येणाऱया दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. नियमित शुल्कासह पहिल्यांदात परीक्षेला बसणारे विद्यार्थी 9 डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज सादर करू शकतात. या मुदतीनंतर अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 20 ते 28 डिसेंबरपर्यंत आहे.
पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे, आयटीआय संस्थेद्वारे परीक्षेस बसू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्यासाठी 10 ते 20 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळांमार्फत मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर परीक्षा अर्ज पाठवायचे आहेत, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत. वर्ष 2022 मधील परीक्षेसाठी नोव्हेंबर-डिसेंबर 2020, सन 2021 अथवा सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षा अर्ज भरता येणार आहे.
बारावी श्रेणीसुधार योजनेच्या गुणपत्रिकेसाठी मुदतवाढ
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2020 व नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या श्रेणीसुधार परीक्षेच्या गुणपत्रिकेसाठी विकल्प सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर श्रेणी सुधार योजने अंतर्गत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी विकल्प सादर करून सुधारित गुणपत्रिकेची मागणी केल्यास सुधारित गुणपत्रिका बदलून देण्याचा कालावधी एक महिन्याऐवजी सहा महिन्यांपर्यंत वाढविण्यात आलेला होता. परंतु कोविडमुळे उद्भवलेली परिस्थिती व विद्यार्थी हित लक्षात घेत, विशेष बाब म्हणून विकल्प सादर करण्यास 15 डिसेंबर 2021पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.



























































