
देशात सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. अनेक सार्वजनिक व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला असून आता शक्य आहे तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून हे व्यवहार केले जात आहेत. पण, तांत्रिक गडबडीमुळे होणारे घोळ त्यात अडचणी निर्माण करत असल्याचं चित्र आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी असाच एक प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन कोचिंगच्या वेळी घडला. भारतीय खेळ प्राधिकरण आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. ऑनलाईन पद्धतीने झूम अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हे शिबिर सुरू होतं. या शिबिरात पुलेला गोपीचंद, इंडोनेशियन प्रशिक्षक अगुस द्वी सांतासो आणि नमरीह सुरोतो यांच्यासह 700 हून अधिक बॅडमिंटन प्रशिक्षक सहभागी झाले होते.
गुरुवारी दुपारी हे प्रशिक्षण शिबिर सुरू असताना 12 वाजून 40 मिनिटांनी एक विचित्र घटना घडली. शिबिरातील कोचिंग स्क्रीनच्या ऐवजी अचानक तिथे अश्लील चित्र दिसू लागलं. त्यामुळे काय करावं हे न कळल्याने गोपीचंद यांच्यासह अनेक प्रशिक्षकांनी ते कोचिंग तिथल्या तिथे थांबवलं आणि अॅप्लिकेशन बंद केलं. हा प्रकार नेमका काय असावा, याचा शोध सुरू आहे. झूम अॅप्लिकेशनच्या असुरक्षिततेबाबत यापूर्वीच गृह मंत्रालयाकडून सूचना जारी झाल्या आहेत. मात्र, हा हॅकिंगचा प्रकार नसून काहीतरी तांत्रिक गडबड असावी असं भारतीय खेळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे.



























































