
>>प्रसाद ताम्हणकर
GST या देशात लागू असलेल्या करप्रणालीवर कायम साधकबाधक चर्चा होत असतात. मात्र तंत्रज्ञान विश्वात त्यावर फारशी चर्चा घडताना दिसत नाही. मात्र नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंगला लक्झरी टॅक्सच्या श्रेणीमध्ये म्हणजेच 28 टक्के कराच्या अंतर्गत घेण्यात आले आणि एकच गदारोळ उडाला. ह्या क्षेत्रातील अनेक तज्ञांची पहिली प्रतिक्रिया अशी की, ‘एक हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगाचे आता काही खरे नाही. हा उद्योग मोडकळीला येणार.’ मात्र काही तज्ञ सरकारच्या ह्या निर्णयाचे ठामपणे समर्थन करताना दिसले. तज्ञांची मतमतांतरे काही असली तरी या निर्णयाच्या दुसऱया दिवशी शेअर मार्केट खुले होताच, गेमिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपन्यांचे शेअर्स धाडकन कोसळले हे सत्य नाकारता येणार नाही. डेल्टा कॉर्प, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी, झेन्सर अशा अनेक नामवंत कंपन्यांना त्याचा फटका बसला.
सरकारच्या ह्या निर्णयाचे दूरगामी पडसाद उमटण्याची भीती आता व्यक्त होते आहे. पूर्वी एखाद्या व्यक्तीने ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर 100 रुपयांची बाजी लावली, तर त्याबद्दल या प्लॅटफॉर्मला सरकारला 1.08 रुपये कर द्यावा लागत होता, आता तो 16 पटीने वाढला असून 1.08 रुपयांच्या जागी सरकारकडे 28 रुपयांचा कर भरावा लागणार आहे. ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया देशांचा उलट सरकारच्या ह्या निर्णयाने फायदा होईल अशी शंका काही तज्ञ व्यक्त करीत आहेत. कारण अशा प्रचंड टॅक्सला सामोरे जाण्यापेक्षा गेमिंग क्षेत्रातील अनेक हिंदुस्थानी कंपन्या देशातून आपला गाशा गुंडाळून जिथे करांमध्ये प्रचंड सवलत आहे, अशा देशाचा मार्ग धरण्याची जास्त शक्यता आहे.
सरकारच्या नव्या निर्णयाचा विचार केल्यास, ह्यापुढे एखाद्या व्यक्तीनं 100 रुपयांची बाजी लावली, तर 28 रुपये सरकारी कर म्हणून ताबडतोब वजा होणार, म्हणजेच त्या व्यक्तीची प्रत्यक्षात 72 रुपयांची बाजी लागणार आणि एवढा सगळा कर भरून तो 54 रुपये जरी जिंकला, तरी त्यावर लगेच त्याला 30 टक्के टीडीएस भरावा लागणार असे गणितदेखील गेमिंग क्षेत्रातले काही तज्ञ उलगडून दाखवत आहेत. खरे तर जागतिक ऑनलाइन गेमिंग क्षेत्रात हिंदुस्थानचा वाटा केवळ 0.07 टक्के इतका किरकोळ आहे. मात्र असे असले, तरी ह्या क्षेत्राचा हिंदुस्थानातीला वाढीचा वेग हा वार्षिक 32 टक्के आहे, जो संपूर्ण जागतिक ऑनलाइन गेमिंग उद्योगाच्या अडीच पट जास्त आहे, हे महत्त्वाचे.
अनेक मोठय़ा जागतिक एजन्सीच्या अभ्यासानुसार, 2022 सालाच्या अखेरीस, जागतिक गेमिंग उद्योग सुमारे 25,000 कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला होता. 2023 मध्ये हा उद्योग 28,200 करोड अमेरिकन डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे आणि 2030 पर्यंत 66,600 करोड डॉलर्स एवढी झेप घेण्याचा अंदाज आहे. म्हणजेच 2023 ते 2030 सालांच्या मध्ये हा उद्योग सरासरी 13.1 टक्के इतक्या वेगाने वाढणार आहे. त्याच वेळी, हिंदुस्थानात 2022 च्या अखेरीस हा उद्योग 13,500 कोटी रुपये होता, जो 2030 पर्यंत 16,700 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि 2025 च्या अखेरीस तो 23,100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ह्या सगळ्या आकडेवारीवरून हा उद्योग काही काळात किती महत्त्वाचा उद्योग सिद्ध होणार आहे हे समोर येत आहे. अशा वेळी, देशातील ह्या ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या वेगाला वेसण घालण्यासाठी सरकारने हे 28 टक्के जीएसटीचे पाऊल उचलले असल्याचीदेखील चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
तज्ञांच्या चर्चा होत राहतील, ऑनलाइन गेमिंग उद्योग ह्यामधून देखील मार्ग काढेल आणि नवी भरारीदेखील घेईल, मात्र आता ह्यापुढे पैसे लावून कोणताही ऑनलाइन गेम खेळताना तुम्हाला सरकारला 1 रुपयाच्या मागे 28 पैसे द्यावे लागणार आहेत हे मात्र नक्की आहे. पैशाच्या हार-जीतवर आधारित असलेले हे खेळ अनेकांसाठी विरंगुळा आहे, कोणासाठी पैसे कमावण्याचे साधन. मात्र हे एक घातक व्यसन आहे आणि त्यापासून दूर राहण्यात खरी भलाई आहे, हे मात्र कोणी नाकारणार नाही.
– [email protected]





























































