खो-खोपटू, प्रशिक्षकांच्या कार्यशाळेला दणदणीत प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आधारस्तंभ शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 7 नोव्हेंबर 2020 शनिवार दुपारी 4 वा. प्रशिक्षक आणि खो-खो खेळाडूंसाठी कोणते व्यायामप्रकार असावेत याबाबत फिजियोथेरेपिस्ट डॉ. कश्मीरा सबनीस यांनी प्रात्यक्षिकासह महाराष्ट्रातील खेळाडू आणि प्रशिक्षक यांना मार्गदर्शन केले. ऑनलाइन झालेल्या कार्यशाळेत महाराष्ट्रातील सुमारे 800 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या कार्यशाळेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचा सहभाग सर्वाधिक होता.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे 7 नोव्हेंबरपासून शनिवारी आणि रविवारी सलग तीन आठवडे खो-खो खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यासाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. ऑनलाइन कार्यशाळेचे प्रास्ताविक राज्य संघटनेचे सचिव गोविंद शर्मा यांनी केले. यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले हिंदुस्थाना खो-खो महासंघाचे सचिव महेंद्रसिंग त्यागी यांनी महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी खेळाडूंनी काय केले पाहिजे यावर मार्गदर्शन करतानाच डॉ. सबनीस यांना खेळाडूंनी उपयुक्त असे प्रश्न विचारले. याप्रसंगी उपस्थित असलेले राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

शनिवारी सांयकाळी 4 ते 6 या कालावधीत ही कार्यशाळा झाली. जॉगिंग हा सर्वच खेळांसाठी उपयुक्त असा व्यायाम प्रकार असल्याचे डॉ. कश्मिरा यांनी सांगितले. संपूर्ण शरीराला व्यायाम कसा मिळेल आणि खेळाडूमधील क्षमता कशी वाढेल यावर त्यांनी चित्रफीत आणि प्रत्यक्ष कसरती करून दाखवत मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र साप्ते, शिरीष मोरे, संतोष सावंत, सुशील इंगोले यांनी मेहनत घेतली.