युवासेनेचा पुढाकार; दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हाती ऑनलाइन प्रश्नसंच; शिक्षकांचे मिळणार थेट मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासाशिवाय पर्यायच उरला नाही. त्यानंतर आता कोरोनाची रुग्णसंख्या ओसरू लागल्यानंतर परिस्थिती सुधारू लागल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा देताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना पदाधिकारी अंकित प्रभू यांच्या पुढाकाराने सुपर माइंड ऍकेडमीच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मोफत प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना हेल्पलाइनद्वारे त्या त्या विषयाच्या शिक्षकांकडून मोफत मार्गदर्शनही केले जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते आज करण्यात आले. परिवहनमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या उपस्थिततीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी अनिल परब म्हणाले, कोरोना काळातील ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे शिक्षण पद्धती बदलली होती. आता ऑफलाइन परीक्षांना सामोरे जाताना युवासेनेच्या पुढाकाराने सुपरमाइंड ऍकेडमीने सुरू केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. विशेष म्हणजे, क्यू आर कोडच्या माध्यमातून स्कॅनिंग करून विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध होणार आहेत. यावेळी युवासेना पदाधिकारी अंकित प्रभू, सुपरमाइंडच्या भागीदार अर्चिता मडके, सीईओ अश्विनी भालेकर, समीर साळुंखे, गौरी निमकर आदी उपस्थित होते.

जोगेश्वरी, दिंडोशीत मोफत प्रश्नसंच

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील ज्येष्ठ शिक्षकांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या आदर्श प्रश्नसंचाचे पुस्तक जोगेश्वरी, दिंडोशीत विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात येणार आहे. या प्रश्नसंचामुळे विद्यार्थ्यांचा सराव होईल, तसेच शिक्षकांचे मार्गदर्शनही हेल्पलाइनमुळे मिळेल, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली.

क्यूआर कोडच्या माध्यमातून दहाकी एस.एस.सी. इंग्रजी, मराठी, सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंच विनामूल्य डाऊनलोड करता येतील.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी शिक्षकांची हेल्पलाइन 9049992807/8/9