एक दिवस आधीच शाळा झाल्या सुरू; खासगी शाळांची ऑनलाइन घंटा वाजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याविषयी राज्यातील शाळांमध्ये गोंधळ असल्याचे समोर आले असून इंग्रजी माध्यमाच्या बहुसंख्य ऑनलाईन शाळांची घंटा एक दिवस आधीच वाजली. काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाबाबत परिपत्रक जाहीर केले होते. त्यात विदर्भ वगळता राज्यातील शाळा 14 जूनपासून सुरू होतील असे म्हटले होते. मात्र नंतर यात दुरुस्ती करून 14 ऐवजी 15 जूनपासून शाळा सुरू कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या; मात्र अनेक शाळांनी आधीच्या सूचना ग्राह्य मानून आज 14 जूनपासूनच ऑनलाईन वर्ग घेण्यास सुरूवात केली आहे.

ऑनलाइन वर्ग घेण्याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना अद्याप न मिळाल्याने शाळांनी गेल्या वर्षीच्या नियोजनानुसार अभ्यास घेण्यास सुरुवात केली आहे; पण गेल्या वर्षी कोरोनामुळे वर्ग उशिरा सुरू झाल्याने पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता. आता यंदाचे नियोजन कसे असेल याची प्रतीक्षा शाळांना आहे. शिक्षक भारतीचे कार्यवाह सुभाष मोरे यांनी सांगितले, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या परिपत्रकावरून शाळांचा गोंधळ झाला असून काहींनी आधीच्या सूचनांनुसार 14 जूनपासून वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. आता शाळांना शिक्षण विभागाकडून ऑनलाइन तासिकांच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. ते मिळाल्यास शाळेच्या कामकाजाला वेळेवर सुरुवात होईल, असेही सुभाष मोरे यांनी स्पष्ट केले.