मनमुराद खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित घोडेकर, [email protected]

फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, मिंत्रा, जबोंग, पेटीएम मॉल अशा एक ना अनेक ऑनलाइन शॉपिंग कंपन्या गेल्या काही वर्षांपासून खूप जोरात आहेत. या शॉपिंग कंपन्यांची नावे अगदी कॉलेजकर तरुण ते अगदी म्हातारे काका सगळ्यांनाच माहीत आहेत. फ्लिपकार्टच्या जाहिरातीत तर चक्क लहान मुलांना घेऊनच ऑनलाइन शॉपिंग कसं करतात हे दाखवलं आहे. मस्करीचा भाग सोडला तर खरंच आजकाल ऑनलाइन शॉपिंग करणे खूप सोपे झाले आहे आणि मोबाईल ऍप्समुळे तर हा अगदी बोटाचा खेळ झाला आहे.

तुम्ही दुकानात जाणार कधी, तुम्हाला दुकानदार वस्तू दाखवणार कधी आणि त्यातली किती विविधता दाखवणार, जर तुम्हाला वस्तू आवडली नाही तर परत घेणार का अशा अनेक अडचणींमधून खरी मुक्ती तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगमधून मिळते. कुठलीही वस्तू मागवा, तीही कमीत कमी किमतीमध्ये, नाही आवडली तर परत करा, तेदेखील तुमच्या घरी येऊन ती परत घेतली जाते. कधी कधी वाटतं की, या ऑनलाइन कंपन्यांना हे सगळं कसं परवडतं? त्यांच्या परवडण्याचं गणित त्यांच्या मोठय़ा ग्राहक क्षमतेमध्ये आहे.

आपल्या याच ग्राहक क्षमतेमुळे ऑनलाइन शॉपिंग कंपन्या अनेक गोष्टी करत होत्या. त्यातली एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ‘ऑनलाइन सेल’. हे ऑनलाइन सेल म्हणजे या शॉपिंगचा अविभाज्य भाग होता. दरवर्षी ठराविक मुदतीत ऑनलाइनच्या जगात खूप उलाढाल होते ती या सेलच्या दिवसांत. या विशेष दिवसांत लोक तुडुंब ऑनलाइन शॉपिंग करायचे. कारण या दिवसांत ऑनलाइन शॉपिंगवर ज्या किमती दिल्या जायच्या अशा किमती कधीही कुठल्याही बाजारात मिळत नसत. कारण बऱयाचदा अशा वस्तू फक्त त्या ऑनलाइन शॉपिंग करणाऱया कंपनीसाठी बनवल्या जात असत. उदाः ऍमेझॉन किंडल किंवा रीडमीचे मोबाईल या वस्तू तुम्हाला ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरच मिळत असत आणि त्याव्यतिरिक्त कुठेही मिळत नसे. त्यामुळे मग ग्राहक आपोआप त्या ऑनलाइन शॉपिंगवरून ती वस्तू विकत घेत असत. त्यामुळे हा ऑनलाइन बाजार आणि त्यातल्या त्यात ऑनलाइन सेल खूपच लोकप्रिय झाला होता, पण त्याच वेळेस त्या ऑनलाइन कंपन्यांचीदेखील मत्तेदारी झाली होती.

म्हणजेच अमुक एक वस्तू फक्त याच ठिकाणी आणि याच किमतीला. त्यामुळे आज जरी स्वस्तात एखादी वस्तू मिळत असली तरी वर्षभर महाग. बरं, दुकानात पण नाही. म्हणजेच तुमच्या पुढे दुसरीकडून घ्यायचा पर्यायच नाही. म्हणूनच नुकताच सरकारने एक कायदा आणला आहे. या कायद्याअंतर्गत आता कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग करणाऱया कंपनीला सेल लावता येणार नाही आणि कोणतेही उत्पादन फक्त त्यांच्याच ठिकाणी विकता येणार नाही. या कायद्यामुळे ऑनलाइन मत्तेदारी कमी होईल आणि कोणतीही वस्तू आता कुठेही त्याच किमतीमध्ये मिळू शकेल. या गोष्टीमुळे आता आपल्याला ऑनलाइन सेल दिसणार नाहीत, पण वर्षभर वस्तू चांगल्या दरात नक्कीच मिळतील.