ऑनलाइन शॉपिंग महागले, सरकारी निर्बंधांचा ई–कॉमर्स कंपन्यांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

ई-कॉमर्स कंपन्यांवर थेट विदेशी गुंतवणुकीबाबत नवा कडक नियम केंद्र सरकारने लागू केल्यामुळे ऑनलाइन शॉपिंग महागले आहे. नव्या निर्बंधांमुळे ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांनी ऑनलाइनवरील ऑफर्स बंद केल्याने शॉपिंग तर महागले आहेच, पण मागवलेल्या वस्तूही ग्राहकांपर्यंत आता उशिरा पोहोचणार आहेत.

ऑनलाइन खरेदी वाढल्याने देशातील किरकोळ बाजार धोक्यात आला होता. किरकोळ व्यापाऱयांनी यासंदर्भात अनेक तक्रारी केल्या होत्या. परदेशी कंपन्यांमुळे देशांतर्गत व्यापाराला फटका बसू लागल्याने केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांवर निर्बंध घातले. या निर्बंधांमुळे त्यांना मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री करता येणार नाही तसेच ग्राहकांना ऑफर्सही देता येणार नाहीत. त्याचप्रमाणे त्यांची भागीदारी असलेल्या कंपन्यांनाही उत्पादने विकता येणार नाहीत.

वेबसाइटवरून महागड्या वस्तू गायब
सरकारी नियमांमुळे ऍमेझॉन, फ्लिपकार्टला मोठे नुकसान होत आहे. या कंपन्यांनी आपल्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशनसह अनेक किरकोळ वस्तू हटवल्या आहेत. क्लाऊडटेल आणि ऍपेरियोनेही काम करणे बंद केले आहे. या कंपन्यांमध्ये ऍमेझॉनची भागीदारी आहे. ऍमेझॉनला 64.2 कोटी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

गोदामांमध्ये हजारो कोटींचा माल पडून
फ्लिपकार्टने या नव्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी हिंदुस्थान सरकारने मुदतवाढ न दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे व्यवसायावर लगेच मोठा परिणाम झालेला नाही, पण गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो कोटींच्या मालाची चिंता फ्लिपकार्टला पडली आहे. अनेक कंपन्यांबरोबर माल खरेदीबाबत केलेल्या करारांमध्येही बदल करावा लागणार आहे असे फ्लिपकार्टने म्हटले आहे.

ऍमेझॉनचे शेअर घसरले
या निर्बंधांचा परिणाम ऍमेझॉनच्या शेअर्सवरही झाला आहे. अमेरिकेसह विविध देशांमधील शेअर बाजारात ऍमेझॉनचा शेअर 5.38 टक्क्यांनी घसरला. वॉलमार्टचा शेअरही 2.06 टक्क्यांनी घसरला. वॉलमार्टची फ्लिपकार्टमध्ये 77 टक्के भागीदारी आहे.