
सोलापूर जिह्यासाठी वरदान असणारे उजनी धरण आता तळ गाठू लागले आहे. 50 दिवसांत तब्बल 30 टीएमसी पाणी संपले आहे. मागील दोन महिन्यांपासून कॅनॉल, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडणे सुरूच आहे. गतवर्षी 12 जूनला मायनसमध्ये गेलेले धरण यंदा 6 मेपूर्वीच मायनसमध्ये जाणार आहे. त्यामुळे 6 मे ते पाऊस सुरू होईपर्यंत जिह्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील, अशी सद्यस्थिती आहे.
उजनी धरणात 120 टीएमसीपर्यंत पाणीसाठा होण्याची मर्यादा आहे. पण, सध्या 20 ते 22 टीएमसीपर्यंत गाळ आहे. त्यामुळे धरण मायनसमध्ये गेल्यानंतर धरणात 64 टीएमसी पाणीसाठा राहील. त्यापैकी 40 ते 44 टीएमसीच पाणी असणार आहे. दरम्यान, 2018-19 मध्ये धरणातील मायनस 27 ते 28 टीएमसीपर्यंत पाणी वापरले होते. यंदाही तशीच वेळ येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
15 जूनपर्यंत पाऊस सुरू झाल्यास मृत साठय़ातील 10 ते 15 टीएमसीपर्यंत पाणी वापरावे लागणार आहे. सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून 433 क्युसेक, बोगद्यातून 710 क्युसेक व कॅनॉलमधून तीन हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे दररोज अर्धा टीएमसी पाणी संपत असून, त्यात पुन्हा बाष्पीभवनाचाही फटका बसत आहे. त्यामुळे 6 मेपर्यंत धरण मायनसमध्ये जाण्याचा अंदाज आहे.
सध्या धरणात जिवंत साठा 6.83 टीएमसी (13 टक्के) पाणी आहे. बोगदा व उपसा सिंचन योजनेतून सोडले जाणाऱया पाण्याचा विसर्ग सध्या पाणीपातळी घटत असल्याने कमी होऊ लागला आहे. 10 मेपर्यंत कॅनॉलचे पाणी राहणार आहे. त्यानंतर बोगदा, कॅनॉल व उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडता येणार नाही. सोलापूर शहराला मे महिन्यात एकदा नदीतून पाणी सोडले जाईल. त्यानंतर धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार आहे.
यंदा टँकरची गरज भासण्याची शक्यता
गेल्यावर्षी पावसाळा साधारणत: 15 ते 20 जूनपासून सुरू झाला होता. त्यावेळी धरण 12 जूनपर्यंत प्लसमध्येच होते. त्यानंतर धरणातील पाणीसाठा काही दिवस मायनसमध्ये राहिला. पण, यंदा 6 मेपासून धरण मायनसमध्ये जाईल, अशी स्थिती आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 36 दिवसांपूर्वीच धरण मायनसमध्ये जाणार असल्याने टँकरमुक्त जिह्यात काही ठिकाणी टँकरची गरज भासेल, असाही अंदाज वर्तविला जात आहे.


























































