मराठवाड्यात केवळ 23.8 टक्के पाऊस; बीड, लातूर, धाराशिव जिल्हे कोरडाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मुंबई, पुण्यासह राज्यभर धोधो कोसळत असलेल्या पावसाने मराठवाडा विभागावर मात्र वक्रदृष्टी केली आहे. पावसाळी हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही मराठवाड्यात कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्याचा खरिपाच्या पेरणीवरही मोठा परिणाम झाला असून, बीड, लातूर आणि धाराशिव हे तीन जिल्हे वीस टक्क्यांच्या आतच आहेत. विभागात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 23.8 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायम आहे.

जून महिन्यात पावसाळी हंगाम सुरू झाला. आज या हंगामाला दोन महिने होत आले आहेत तरीही मराठवाडा विभागात कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही, देशभर आणि राज्यभर सर्वत्र धो-धो कोसळत असताना विविध राज्यात पुराने थैमान घातलेले असताना मराठवाड्यात मात्र बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. खरिपाची केलेली पेरणी वाया जाण्याचा धोका वाढला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. उन्हाळ्यात सुरू केलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर्स भर पावसाळ्यातही चालूच आहेत. टँकर्सशिवाय पाणी मिळणे कठीण आहे. त्यामुळे पशुपालकांचीही पंचाईत झाली आहे. सध्या पडत असलेला भुरभुर पाऊस हा उगवून आलेल्या खरिपाच्या पिकांना मात्र जीवदान देणारा ठरत आहे.

बीडसह तीन जिल्हे कोरडेच
मराठवाडा विभागाचे वार्षिक पर्जन्यमान हे 779.00 मिलीमीटर असून, आजमितीला या विभागात 324.46 मि. मी. पाऊस पडणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात या विभागात केवळ 185.31 मि. मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत पडलेला पाऊस हा वार्षिक सरासरीच्या 23.8 टक्के आहे. अपेक्षित पावसाच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पुन्हा दुष्काळाला सामोरे जावे लागते की काय अशी शंका घर करून आहे. विभागातील 8 जिल्ह्यांपैकी बीड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांत पडलेल्या पावसाची वार्षिक टक्केवारी 20 टक्क्यांपेक्षा कमीच आहे. हे तीन जिल्हे तसे कोरडेचे म्हणावे लागत आहेत. अन्य जिल्ह्यात संभाजीनगर 32.4 टक्के, जालना-29.5 टक्के, हिंगोली-24.5, परभणी-22.6 टक्के आणि नांदेड जिल्ह्यात 24.3 टक्के पाऊस झाला आहे.

36 लाख नागरिकांचे तहान टँकर्स भागवतात
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे, मराठवाडा विभागात कुठे समाधानकारक पाऊस झाला नसल्याने उन्हाळ्यात सुरू झालेले पाण्याचे टँकर्स अद्याप सुरूच आहेत. विभागातील 36 लाख नागरिकांची तहान 2011 टँकर्स भागवत आहेत. यासाठी प्रशासनाने 5 हजार 409 खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. टँकर्सने पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यात विभागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे.