
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष बीकॉम सत्र 6च्या परीक्षेत केवळ 38.32 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेत नोंदविलेला हा सर्वात कमी निकाल आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण 60 हजार 285 विद्यार्थ्यांपैकी केवळ 15 हजार 346 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे पदवी अभ्यासक्रमाचे पहिले आणि दुसरे वर्ष ऑनलाइन अभ्यास करणारे आणि परीक्षादेखील ऑनलाइन देणारे विद्यार्थी यंदाच्या वर्षी अंतिम वर्षाला होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षे अभ्यासाची सवय सुटलेल्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात बीकॉमची पदवी मिळविता आलेली नाही.
बीकॉम अभ्यासक्रम सत्र 5 ची परीक्षा मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पार पडली होती. या परीक्षेतही नापास होणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण सारखेच आहे. सत्र 6 च्या परीक्षेत किमान 50 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतील, अशी आशा प्राचार्यांना होती. मात्र परीक्षेत उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. कोरोना काळात बीकॉमचा निकाल हा 90 टक्क्यांच्या घरात लागला होता. या परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या तसेच परीक्षेत प्रामुख्याने मल्टिपल चॉइस प्रश्न विचारण्यात आले होते. हाच निकाल कोरोनाच्या आधी 60 ते 70 टक्के इतका लागत होता.
बीकॉमच्या परीक्षेत 63 हजार 354 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 60 हजार 285 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये 15 हजार 346 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 24 हजार 701 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 3 हजार 69 विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. 285 विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. उन्हाळी सत्रात झालेल्या परीक्षेच्या मूल्यांकनावर कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्पे व प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे हे सतत लक्ष ठेवून होते. तसेच सदरचा निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचे संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. प्रसाद कारंडे तसेच परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते.























































