
मुंबई-गोवा महामार्गाचे काम 30 मेपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन पेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात दिले. परंतु मात्र चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाचे काम फक्त 50 टक्केच पूर्ण झाले असून संगमेश्वर, सोनवी येथील पुलांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. या कामाला अजून वर्षभराचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई-गोवा चौपदरीकरणाची 30 मेची डेडलाईन हुकणार आहे.
मुंबई व गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा आणि कोकणातून जाणाऱया मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सतरा वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. तत्कालीन पेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः कोकणात येऊन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. वेगवेगळ्या ठिकाणी पुलांचे भूमिपूजन केले होते. कोकणातून जाणारा हा महामार्ग दर्जेदार होईल, वाहनातून प्रवास करताना वाहनात असलेल्या प्रवाशाच्या हातातील कपातील कॉफीचा एक थेंबही खाली सांडणार नाही असे त्यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात या-ना-त्या कारणाने हा महामार्ग रखडला. एक दोन नव्हे, तर 17 वर्षे महामार्गाची रखडपट्टी सुरू आहे.
मंत्र्यांकडूनतारीख पे तारीख
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांच्याकडून वारंवार वेगवेगळ्या डेडलाईन दिल्या गेल्या, परंतु या डेडलाईन कधीच पूर्ण झाल्या नाहीत. आता स्वतः नितीन गडकरी यांनी 20 मेची डेडलाईन दिली आहे, परंतु त्यांच्यापर्यंत कामाच्या सद्यस्थितीची माहिती संबंधित विभागाने पोहोचवलेली नाही. त्यामुळे 30 तारखेपर्यंत काम पूर्ण होणे अशक्य आहे.
उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदी येथून बहादूर शेख नाका ते युनायटेड हायस्कूल, असा उड्डाणपूल उभारला जात आहे. सुरुवातीला या पुलाचे काम सुरू असताना गर्डर कोसळला. मग पुन्हा नव्याने काम हाती घेण्यात आले. आता हे काम 50 टक्केही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उर्वरित 23 दिवसांत काम कसे पूर्ण होणार, हा प्रश्नच आहे.