लसीकरण करूनच आरोपीला कोठडीत आणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला हरवायचे असेल तर लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आर्थर रोड कारागृह अधीक्षकांनी थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आरोपीला पकडल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी कराच, पण त्याचबरोबर त्याचे लसीकरणदेखील करा. मगच त्याला कारागृहात घेऊन या, असे आवाहन केले आहे.

एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर त्याची रवानगी कारागृहात केली जाते. पण सद्यस्थितीत कोरोनाच्या संकटामुळे आरोपीला कारागृहात दाखल करण्यापूर्वी त्याची पोलिसांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. न्यायालयाचे असे आदेश असल्याने पोलीस कोणत्याही आरोपीची आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच कारागृहात दाखल करतात. पण असे असले तरी आरोपीला पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी त्याची आरटीपीसीआर चाचणी व लसीकरण करावे, असा विनंती अर्ज आर्थर रोड कारागृह अधीक्षकांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केला आहे.