
गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी झाली. एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत दोघांचे कार्यकर्ते भिडले. या टोळीयुद्धानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
यापुढे विधान भवनात केवळ सदस्य, पीए, शासकीय अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे, असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. काळ घडलेल्या घटनेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी घडलेल्या प्रकारावर बोलताना विधानसभेत राहुल नार्वेकर म्हणाले की, “ज्यांनी राडा घातला त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना व अनधिकृतपणे हे अभ्यांगत सदस्यांसोबत आले. हे आक्षेपार्ह कृत्य आहे. विधानभवन सभागृहात असे कधीही झाले नाही. मुळात त्या अभ्यांगतांना आत आणायची काहीही गरज नव्हती. असे अभ्यांगत आले तर त्यांची जबाबदारी संबंधित आमदारांची असते.” ते म्हणाले की, विधीमंडळाची परंपरा जपण्याचे उत्तरदायित्त्व हे आमदारांचे आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खेड व्यक्त केला.