
सामना ऑनलाईन । मुंबई
एकेकाळी हिंदुस्थानी क्रिकेट क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या मुंबईच्या क्रिकेटला अवकळा प्राप्त झालीय का? असा यक्षप्रश्न मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए ) प्रशासकांपुढे उभा ठाकला आहे. एमसीएच्या प्रशिक्षकपदासाठी केवळ सहाच अर्ज आल्याने प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया ११ जुलैपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय एमसीए आणि असोसिएशनच्या क्रिकेट सुधार समितीने घेतला आहे. मुंबईचा सिनियर क्रिकेट संघ आणि अंडर १९ संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची तारीख आता ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.
हिंदुस्थानचे माजी वेगवान गोलंदाज आणि एमसीए क्रिकेट सुधार समितीचे सदस्य करसन घावरी मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी कमी अर्ज आल्याने नाराज आहेत. ते म्हणतात , मुंबईसारख्या नामांकित क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी पूर्वीसारखी मोठी स्पर्धा आता दिसत नाही. आता प्रशिकपदासाठी फक्त सहाच जणांचे अर्ज आल्याने आम्ही ती निवड प्रक्रिया ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. आजच्या तारखेपर्यंत मुंबई संघाचे प्रशिक्षकपद मिळविण्यासाठी रमेश पवार, अजय रात्रा, विनायक सामंत, प्रीतम गंधे, विनोद राघवन आणि नंदन फडणीस या सहा जणांचेच अर्जअसोसिएशनकडे आले आहेत .
ट्रेनर आणि फिजिओ हायर करणार
मुंबईच्या सिनियर आणि अंडर १९ क्रिकेट संघासाठी ट्रेनर आणि फिजिओ हायर करण्याचा निर्णय एमसीने घेतला आहे. त्यासाठी संघटनेने प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुपशी करार केल्याची माहितीही घावरी यांनी दिली. या नियुक्त्या झाल्यावर मुंबई संघांची प्रशिक्षण शिबिरे सुरु होतील असेही ते म्हणाले. एमसीए क्रिकेट सुधार समितीत आता माजी वेगवान गोलंदाज राजू कुलकर्णी, बलविंदर संधू, माजी धडाकेबाज फलंदाज अमोल मुझुमदार आणि माजी सलामीवीर साहिल कुकरेजा यांचाही समावेश केला जाणार आहे.

























































