
पुणे बाजार समितीत गूळ भुसार बाजारात ऐन आचारसंहितेत ओपन स्पेसवर बांधकाम सुरू केले आहे. ओपन स्पेस असताना संबंधित जागेची विक्री कशी झाली? असा सवाल उपस्थित झाला आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवणीतून ओपन स्पेस विकली गेल्याची चर्चा असून यामध्ये संचालक मंडळासह स्थापत्य विभागाचे अभियंते आणि मालमत्ता विभागातील अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
संचालक मंडळाच्या काळातच मार्केटयार्डातील गूळ भुसार बाजारात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बाजारातील मोकळ्या जागांवर आता डोळा ठेवून असलेल्या संचालक मंडळाने तशा हालचाली सुरू केल्या आहेत. यापुर्वी २२ वर्षांपुर्वी याच संचालक मंडळातील काही संचालकांनी मोकळ्या जागा बेकायदा पध्दतीने विकल्या होत्या. मुलाणी अहवालात या सर्व गोष्टींचा समावेश असून भ्रष्ट्राचाराप्रकरणी अजूनही पाच संचालकांना कोर्टाचे खेटे मारावे लागत आहेत. आता पुन्हा संचालक मंडळाने मोकळ्या जागांकडे मोर्चा वळविला आहे. गुळ भुसार बाजारातील भूखंड क्रमांक २१० मधुरम सेल्स यांनी शेजारील मोकळ्या जागेवर ताबा घेत बांधकाम सुरू केले आहे. पणन संचालकांच्या मनमानी कारभाराकडे मात्र पणन संचालक, जिल्हा उपननिबंधक यांचे दुर्लक्ष आहे.
अभियंते, मालमत्ता विभाग प्रमुख अडचणीत!
मोकळ्या जागा या विक्रीसाठी नसतानादेखील बाजार समतीने पुन्हा त्यात लक्ष घातले आहे. या प्रकरणात तत्कालीन अभियंता आणि उपयअभियंता यांनी ओपन स्पेस जागेची गोष्ट निदर्शनास आणून देणे गरजेचा असताना त्यांनी दुर्लक्ष केले आहे. तर, भाडेपट्टा करून देणारे मालमत्ता विभागातील विभाग प्रमुखदेखील अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
गुळ भुसार बाजारातील भूखंड क्रमांक २१० मधुरम सेल्स यांना लगतच्या जागेला कंपाऊंड घालण्याची परवानगी दिली आहे.
– डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.






























































