
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱयांना आपल्या पक्षात घेण्याचा धडाका सुरू केला आहे. यामुळे बिथरलेल्या शिंदे गटाने थयथयाट सुरू केला आहे. कल्याण लोकसभेतील माजी नगरसेवकांसह 15हून अधिक पदाधिकारी फोडल्याने शिंदे गटाने भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चा धसका घेतला आहे.
रवींद्र चव्हाण यांनी जुलै महिन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर त्यांनी कल्याण लोकसभेतील शिंदे गटातील प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये घेऊन खासदार श्रीकांत शिंदे यांना शह दिला आहे. डोंबिवलीतील माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, संजय विचारे, पूजा म्हात्रे, योगेश म्हात्रे, अनमोल म्हात्रे तसेच कल्याण पूर्वेतील पदाधिकारी संजय गायकवाड, देवानंद गायकवाड, अनंता गायकवाड, विजय जोशी, उल्हासनगरमधील माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल या प्रमुखांनी शिंदे गटाची साथ सोडून कमळ हाती घेतले आहे. महापालिका निवडणुका जाहीर होताच आणखी पदाधिकारी शिंदे गटाची साथ सोडणार असल्याचे समजते.































































