लष्कराचे ऑपरेशन शिवशक्ती; पूंछमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा, नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करताना कारवाई

‘ऑपरेशन महादेव’ नंतर लष्कराने ‘ऑपरेशन शिवशक्ती’ राबवून पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणाऱया दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे वृत्त आहे. मंगळवारी रात्री उशिरा सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना देगवार सेक्टरच्या मालदीवेलन भागात संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर चकमक सुरू झाली, अशी माहिती लष्करी अधिकाऱयांनी दिली. दहशतवाद्यांकडून 3 शस्त्रs आणि दारूगोळादेखील जप्त करण्यात आला.

गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी चकमक असून 28 जुलै रोजी श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात सुरक्षा दलांनी तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाशिम मुसा या हल्ल्यात मारला गेल्याचा दावा अधिकाऱयांनी केला. उर्वरित दोन दहशतवाद्यांची ओळख जिब्रान आमि हमजा अफगाणी अशी असल्याचे अधिकाऱयांनी म्हटले होते.

पहलगाम हल्ल्यासाठी टीआरएफ जबाबदार- संयुक्त राष्ट्रे

पहलगाम हल्ल्यासाठी ‘टीआरएफ’ अर्थात द रेझिस्टंट फ्रंट जबाबदार असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सॅक्शन्स मॉनिटरिंग टीमने आज जागतिक दहशतवादी संघटनांवरील अहवाल प्रसिद्ध केला. त्यात पहलगाम हल्ल्यासाठी ‘टीआरएफ’ जबाबदार असल्याचा दावा केला आहे.