
सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारूधंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ ही मोहीम सुरू केली असून, त्या स्वतः रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी मुळेगाव तांडा, भानुदास तांडा येथे छापा टाकून तब्बल 10 लाख रुपयांचे साहित्य नष्ट केले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेली हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक सातपुते यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतःसह सर्व पोलीस अधिकाऱयांकडे जिल्ह्यातील 71 दारूनिर्मिती व विक्री केंद्रे कारवाईसाठी व रोजगाराबाबत मदत व मार्गदर्शनासाठी दत्तक दिली आहेत. त्यानुसार त्यांनी स्वतः व अपर अधीक्षक झेंडे यांनी मुळेगाव तांडा येथे पोलिसांची कुमक घेऊन धाड टाकली. यावेळी टाकलेल्या छाप्यात 11 आरोपींची हातभट्टी दारू, 48 हजार 200 लिटर गूळमिश्रित रसायन असे 10 लाख 15 हजारांचे साहित्य नष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस अधिकाऱयांनी कारवाई केली असून, सर्वत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अरुण फुगे, काजुळकर व पोलीस अधिकारी-कर्मचाऱयांनी भाग घेतला.
जेसीबीने स्वतःची हातभट्टी केली नष्ट
मुळेगाव तांडा येथे कारवाई केल्यानंतर गावातील तरुण मुलांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हातभट्टी दारूमुळे होणारे दुष्परिणाम व त्यापासून परावृत्त होण्यासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये त्या गावातील राज चव्हाण याने स्वतःची दारूची भट्टी स्वतः जेसीबी मशीनने नष्ट केली असून, यापुढे हातभट्टीची दारू गाळणार नसल्याचे सांगितले.





























































