
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 16 व्या दिवशी, हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुस्थानने बुधवारी पहाटे अमेरिका, रशिया आणि ब्रिटनसह अनेक प्रमुख देशांना त्यांच्या कारवाईची माहिती दिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत, पाकिस्तानच्या 100 किमीच्या परिघात असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले.
हिंदुस्थानने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमधील 9 वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सुमारे एक डझन दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. हे लक्ष्य पाकिस्तान सीमेपासून 100 किमी अंतरावर होते. दहशतवाद्यांच्या डझनभर अड्ड्यांचा हल्ला करून त्यांचा नाश करण्यात आला.
पहाटे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला. हिंदुस्थानी सशस्त्र दलांनी हल्ल्यांमागे असलेल्या या दहशतवादी छावण्या ओळखल्या आणि त्यांना लक्ष्य केले. हवाई दलाच्या हल्ल्यात 4 जैश-ए-मोहम्मद, 3 लष्कर-ए-तैयबा आणि 2 हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी अड्ड्यांचा खातमा करण्यात आला.
हिंदुस्थानने लक्ष्य केलेल्या दहशतवादी अड्ड्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय देखील समाविष्ट आहे. याशिवाय लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे तळही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. सर्वात मोठा हल्ला बहावलपूरमध्ये करण्यात आला, जो आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी आत असून, जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आहे.
सांबा सेक्टर सीमेपासून 30 किमी अंतरावर मुरीदके नावाच्या ठिकाणी लष्कर-ए-तैयबाचा एक तळ होता. तेही जमिनदोस्त झाले आहे. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी येथूनच आले होते. सैन्याने तिसरा हल्ला गुलपूर येथे केला, जो पुंछ-राजौरीच्या नियंत्रण रेषेच्या आत सुमारे 35 किमी अंतरावर आहे.