
अखेर सिंदूरचा बदला सिंदूरने घेतला गेला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 7 मे रोजी मध्यरात्री 1.30 वाजता हिंदुस्थाने पाकिस्तानवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर, हिंदुस्थानी सैन्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले, जय हिंद, न्याय झाला आहे. ही कारवाई सुरू करण्यापूर्वी, सैन्याने हल्ला करण्यास तयार, जिंकण्यासाठी प्रशिक्षित अशी पोस्ट केली होती.
संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट करून या हल्ल्याची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध केलेल्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अचूक आणि संयमी प्रत्युत्तर आहे. असे संरक्षण मंत्रालयाने पोस्ट केले.
सौभाग्यवतींच्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी, हिंदुस्थानने राबवले Operation Sindoor
या कारवाईची माहिती देताना, संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, सीमापार दहशतवादी नियोजनाच्या मुळांना लक्ष्य करून, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि कश्मीरमधील 9 दहशतवादी पायाभूत सुविधांच्या ठिकाणी लक्ष केंद्रित हल्ले करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला झाला नाही.
संरक्षण मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, ही एक मोजमाप केलेली कारवाई आहे ज्यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य केलेले नाही. हिंदुस्थानने आपले लक्ष्य निवडण्याच्या पद्धतीत खूप संयम दाखवला आहे. यासोबतच, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्याने दिली.