Operation Sindoor- मिनिट टू मिनिट तपशील! हिंदुस्थानने कसा घेतला पहलगामचा बदला, वाचा सविस्तर

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अखेर हिंदुस्थानने  पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. या आपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरा तिन्ही दलांनी संयुक्त कारवाईत 9 ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.

 

ऑपरेशन सिंदूरचा मिनिट-टू-मिनिट तपशील

मंगळवारी मध्यरात्रीनंतर मुझफ्फराबाद शहराभोवती असलेल्या डोंगराळ भागात अनेक मोठे स्फोट ऐकू आल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटांनंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला.

 

यानंतर काही वेळातच पाकिस्तानी लष्कराकडून एक निवेदन आले. हिंदुस्थानच्या कृतीला प्रत्युत्तर देऊ असे त्यांनी सांगितले.

 

हिंदुस्थानकडून पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हल्ला केल्याची अधिकृत माहिती समोर आली. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. एकूण 9 ठिकाणी हल्ले झाले.

 

रात्री 1.45 – पाकिस्तानच्या डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.

 

पहाटे 4.13 – हल्ल्यांमध्ये हिंदुस्थानी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचा वापर करण्यात आला. यामध्ये प्रिसिजन अटॅक वेपन सिस्टीमचा वापर करण्यात आला.

 

 

पहाटे 4.32 : अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानी एनएसए आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांच्याशी चर्चा केली.

 

पहाटे 4.35 : हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाणाऱ्या अनेक विमान उड्डाणे रद्द.

 

पहाटे 05.04- हल्ला झालेली 9 ठिकाणे 4 पाकिस्तानात आणि 5 पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. पाकिस्तानमधील तळांमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट यांचा समावेश आहे.

 

पहाटे 5.27: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो म्हणाले की, आम्ही हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. अमेरिकेला आशा आहे की हे लवकरच संपेल.

 

सकाळी 5.45 – कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली.

 

सकाळी 6.00 वाजता- पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आहे आणि पूंछ-राजौरी सेक्टरमधील भिंबर गली भागात तोफखान्यांसह गोळीबार केला आहे.

 

सकाळी 6.08 वाजता- ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले सर्व भारतीय वैमानिक आणि लढाऊ विमाने सुरक्षितपणे तळावर परतली.

 

सकाळी 6.14 वाजता- पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले.