Operation Sindoor – हिंदुस्थानचं राफेल पाडलं! पुरावा मागताच पाकच्या संरक्षण मंत्र्यांची बोबडी वळाली

हिंदुस्थानी सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकड्यांना हिसका दाखवला. धर्म विचारून मायभगिनींच्या सौभाग्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची 9 तळं जमीनदोस्त केली. पण एवढं होऊनही वारंवार खोटं बोलण्याची पाकिस्तानची खुमखुमी काही गेलेली नाही. ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हिंदुस्थान विरोधात अनेक दावे केले. पण याचा पुरावा मागितला तेव्हा नेहमीप्रमाणेच पाकडे तोंडावर आपटले.

ख्वाजा आसिफ हे सीएनएन वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांच्या विधानांनीच त्यांना खोटे पाडले. हिदुस्थानच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानचा पराभव झाला. पण हा पराभव लपवण्यासाठी पाकिस्तानी हवाई दलाने हिंदुस्थानचे 5 राफेल विमानं पाडल्याचा दावा केला. पण जेव्हा त्यांना याचा पुरावा मागण्यात आला तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि त्यांनी बेजबाबदार उत्तरे दिली. याचे पुरावे सोशल मीडियावर आहेत, असे ख्वाजा आसिफ म्हणाले.

एका पत्रकराने मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. हिंदुस्थानला तुमच्या दाव्याचा पुरावा हवा आहे. कारण 5 राफेल विमाने पाडण्याचा तुमचा दावा अतिशय गंभीर आरोप आहे, तर याचा पुरावा कुठे आहे? असा प्रश्न तिने विचारला. यावर ख्वाजा आसिफ म्हणाले की, हिंदुस्थानची राफेल विमाने पाडण्यात आल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे फक्त पाकिस्तानच्या सोशल मीडियावरच नाही तर हिंदुस्थानच्या सोशल मीडियावरही आहे, असे विधान गांगरून गेलेल्या संरक्षण मंत्र्यांनी केले आहे.

पाकिस्तानी नागरिकाकडूनच सैन्याची पोलखोल

पाकिस्तानच्या बड्या बड्या बातांवर आता पाकिस्तानी नागरिकही वैतागले आहेत. एका पाकिस्तानी नागरिकानेच आपल्या सैन्याचे आणि देशाचे पितळ उघडले पाडले आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाकिस्तानी सैन्याची एअर डिफेन्स सिस्टीम क्षेपणास्त्रांना रोखण्यात अपयशी ठरली आहे. एकाही क्षेपणास्त्राला आपल्याला रोखता आले नाही. हिंदुस्थानने खरंच घुसून मारले आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानची विमानं पाडली, अशी बातमीही व्हायरल केली जात होती. पण पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या या सर्व बातम्या खोट्या आहेत. पाकिस्तानकडून दाखवण्यात येत असलेले विमानांचे सर्व फोटो जुने आहेत, असे म्हणत पाकिस्तानी नागरिकानेच पाकच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला आहे.