सीसीटीव्ही बसविण्याला विरोध, कार्यालयाची तोडफोड दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीसीटीव्ही बसविण्याला विरोध करून टोळक्याने एकाला धमकी देऊन कार्यालयासह दुचाकीची तोडफोड केल्याची घटना पुण्यातील वानवडीतील रामटेकडी परिसरात घडली आहे.  8 मे रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली.

महादेव बसवराज पाटील (वय 36, रा. रामटेकडी) व तौसिफ रियाज शेख (18) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी किसन आदमाने (वय 33, रा. हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

किसन आदमाने हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयासमोर संजय घोडके यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी वस्तीत राहणारे महादेव व तौसिफ हे तेथे आले. इथे कॅमेरे लावायचे नाहीत. नाहीतर तुझा कार्यक्रम करून टाकेन, अशी धमकी त्यांनी दिली. दुचाकीवर कोयत्याने मारून तोडफोड केली. कोयता हवेत फिरवून माझ्या नादाला लागला, तर तुझा इथच गेम करून टाकेन अशी धमकी दिली. याप्रकरणी आणखी तिघांचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक माया गावडे तपास करीत आहेत.