महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची सरकारकडून अवहेलना, सहा महिने केवळ घोषणांवर बोळवण

देशात आणि परदेशात महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची सरकारकडून अवहेलना होत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केला. गेल्या वर्षी विविध खेळांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी करणाऱया राज्यातील खेळाडूंना रोख रकमेची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र सहा महिने उलटून गेले तरी विजेत्या खेळाडूंना ना घोषित करण्यात आलेली रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव करण्यात आला. या खेळाडूंना घोषित केलेली रक्कम तातडीने देण्यात यावी आणि त्यांचा उचित गौरव करण्यात यावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

महाराष्ट्रातील खेळाडूंनी गेल्या वर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्तरावर विविध खेळांमध्ये 286 पदकांची लयलूट केली. या वर्षीच्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतही चमकदार कामगिरी करत देशात सर्वाधिक पदके पटकावली. या खेळाडूंना रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव केला जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती, मात्र त्याची अंमलबजावणी केलेली नाही.