
लखीमपूर खेरी प्रकरणात ज्यांचे चिरंजीव दोषी आढळले आहेत त्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे, अशी एकमुखी मागणी करत विरोधकांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत रुद्रावतार धारण केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लखीमपूरप्रकरणी आपण स्थगन प्रस्ताव दिला असल्याची आठवण करून दिल्यानंतर अध्यक्षांनी राहुल गांधी यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकार व उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. लखीमपूर खेरीमध्ये दिवसाढवळ्या शेतकऱयांना चिरडून मारणारे लोक आज केंद्रीय मंत्रिमंडळात ठाण मांडून बसले आहेत. ही लांच्छनास्पद बाब असून अजय मिश्रा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करा, अन्यथा राजीनामा होत नाही तोवर संसदेचे कामकाज चालणार नाही असा इशाराही राहुल गांधींनी दिला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे अध्यक्षांनी कामकाज दुपारी 2 व त्यानंतरही गोंधळ व घोषणाबाजी सुरूच राहिल्याने शून्य प्रहर गुंडाळत अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही लखीमपूर खेरीचा विषय गाजला. सभागृहाचे कामकाज दुपारी 2 व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.





























































