
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या, 28 जानेवारीपासून सुरू होत आहे. अमेरिकन टॅरिफमुळे उडालेली घबराट, वाढती महागाई, बेरोजगारी, यूजीसीच्या नव्या नियमांचा वाद आणि प्रयागराजमध्ये साधुसंतांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनाची सुरुवात वादळी होण्याची शक्यता आहे. जनहिताच्या मुद्दय़ांवरून सरकारला चहूबाजूंनी घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार असून 26 वर्षांनंतर पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाईल. निर्मला सीतारामन रविवारी अर्थसंकल्प मांडतील.
जी राम जी विधेयक, एसआयआरवर चर्चेस नकार
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला काँग्रेसचे जयराम रमेश, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते. जी राम जी विधेयक व एसआयआर यांसारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा व्हावी अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली, मात्र सरकारने ठाम नकार दिला.
हे मुद्दे गाजणार
- वाढती बेरोजगारी आणि महागाई
- एसआयआर
- प्रयागराजमध्ये साधुसंतांना झालेली मारहाण
- यूजीसीचे नवे वादग्रस्त नियम
- परराष्ट्र धोरण कणखरपणे राबवण्यात केंद्राला आलेले अपयश
- घसरत चाललेला रुपया
- दिल्लीसह विविध शहरांतील वाढते प्रदूषण
- व्हीबी जी राम जी विधेयक
- विरोधी पक्षांच्या सरकारच्या कारभारात राज्यपालांचा हस्तक्षेप

























































