
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा महिलांनी पतीच्या जिवाची भीक मागण्याऐवजी दहशतवाद्यांशी लढायला हवे होते, असे विधान भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांनी केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर मध्य प्रदेशचे भाजप नेते, मंत्री विजय शहा यांनी कर्नल कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, तर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांचीही जीभ घसरली. आता आणखी एका भाजप खासदाराने अकलेचे तारे तोडल्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पर्यटक महिलांचे कुंकू पुसण्यात आले. या महिलांनी अहिल्यादेवी यांचा इतिहास वाचला असता तर त्यांच्या पतीवर गोळय़ा झाडण्याची कुणाची हिंमत झाली नसती. दहशतवाद्यांशी लढता लढता त्याही शहीद झाल्या असत्या. त्या महिलांमध्ये शौर्य आणि धाडस नव्हते म्हणून त्या दहशतवाद्यांपुढे हात जोडून विनवणी करत होत्या, असे जांगडा यांनी म्हटले आहे. त्याहीपुढे जाऊन ते म्हणाले, पर्यटक महिलांनी दहशतवाद्यांशी दोन हात केले असते तर कमी लोक मारले गेले असते. जर सर्व पर्यटक अग्निवीर असते तर निश्चितच त्यांनी दहशतवाद्यांशी झुंज दिली असती. आपल्याला राणी अहिल्यादेवींप्रमाणे सर्व महिलांमध्ये शौर्याची भावना जागृत केली पाहिजे, असे जांगडा यांनी म्हटले आहे. दरम्यान, जांगडा यांनी मी राणी अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त बोलत होतो, याचा संदर्भ देताना मी हे विधान केले, असे म्हटले आहे.
या विधानाशी भाजप सहमत आहे का? काँग्रेसचा सवाल
भाजप जांगडा यांच्यासह मंत्री, नेत्यांच्या विधानांशी सहमत आहे का? आता जांगडा यांच्यावर कारवाई होणार की भाजप त्यांना वाचवणार, असे सवाल काँग्रेसने केले आहेत. जर जांगडा यांच्यावर कारवाई केली नाही तर जांगडा यांचे विधान नरेंद्र मोदी यांचे विधान मानले जाईल, असा इशाराही काँग्रेसने जांगडा यांचा व्हिडीओ ‘एक्स’वरून शेअर करताना दिला आहे.